पाकिस्तान संघाचं प्रशिक्षकपद नको रे बाबा!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पाकिस्तान संघाचं प्रशिक्षकपद नको रे बाबा!

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज वसीम अकरमने प्रशिक्षक पदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वसीम अकरमकडे क्रिकेटचा चांगला अनुभव असून १९९२ विश्वचषक विजेत्या संघात त्याची मोलाची भूमिका होती.त्याच्या नेतृत्वाखालील संघ १९९९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. तसेच टी २० लीगमध्ये त्याने एका संघाचं प्रशिक्षपदही भूषवलं आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्ये कोलकाता नाइट राइडर्सच्या सहयोगी स्टाफमध्ये होता. त्यानंतर पाकिस्तान सुपर लीगच्या फ्रेंचाइजीसोबत काम करत आहे. असं असूनही पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक बनण्यास त्याने नकार दिला आहे.

“जेव्हा आपण प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारतो, तेव्हा आपल्याला २०० ते २५० दिवस संघासोबत राहणं गरजेचं असतं. एक जबाबदारी असते. मला वाटत नाही, पाकिस्तानात माझ्या कुटुंबीयांपासून दूर राहत मी ही भूमिका बजावू शकतो. मी पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळाडूंसोबत वेळ घालवला आहे. त्या सगळ्यांकडे माझा नंबर असून ते माझ्याकडे गरजेवेळी सल्ला मागतात.” असं वसीम अक्रमने क्रिकेट कॉर्नरवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितंल. “मी मुर्ख नाही. मी सोशल मीडियावरील घडामोडींवर माझी नजर असते. लोकं आपल्या प्रशिक्षक आणि वरिष्ठांसोबत कसे वागतात, हे पाहिलं आहे. प्रशिक्षक खेळत नाही. खेळाडू खेळत असतात. प्रशिक्षक फक्त योजना तयार करण्यासाठी मदत करतो. जेव्हा संघ पराभूत होतो, तेव्हा मला वाटत नाही प्रशिक्षक यासाठी जबाबदार असतो.” असंही वसीम अकरमने पुढे सांगितलं. ‘या सर्व बाबींबद्दल मला भीती वाटते. मी अपमान सहन करू शकत नाही. माझं लोकांवर प्रेम आहे. मात्र सोशल मीडियावर होणारी बाबींबाबत चीड आहे. यामुळे आपण कोण आहोत हे कळतं. मी असं दुसऱ्या देशात कधीच पाहिलं नाही’, असं वसीम अकरम पुढे सांगितलं.