माजी क्रिकेट प्रशिक्षक वासू परांजपे यांचे निधन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

माजी क्रिकेट प्रशिक्षक वासू परांजपे यांचे निधन

नामांकित प्रशिक्षक वासू परांजपे यांचे सोमवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी ललिता, दोन मुली आणि मुलगा जतीन असा परिवार आहे.

गेली सहा दशके भारतीय आणि विशेषत: मुंबईच्या क्रिकेटसाठी परांजपे यांनी प्रशिक्षक, निवड समिती सदस्य, मार्गदर्शक अशा अनेक भूमिका पार पाडल्या. वासूसरांप्रमाणे मुंबईच्या क्रिकेटची नाडी कुणालाच ठाऊक नाही, असे त्यांच्याविषयी म्हटले जाते. महान क्रिकेटपटू सुनील गावस्करला ‘सनी’ हे टोपणनाव त्यांनीच दिले.

२९ प्रथम श्रेणी सामन्यांत दोन शतकांसह ७८५ धावा अशी परांजपे यांची आकडेवारी फारशी लक्षवेधी नव्हती. पण खेळाची जाण आणि खेळाडूंच्या दृष्टिकोनावर मेहनत घेणे, हे त्यांचे वैशिष्टय़ होते. त्यांना हिंदी, इंग्रजी, मराठी आणि गुजरात अशा चार भाषा अवगत होत्या.

माजी क्रिकेटपटू आणि निवड समिती सदस्य मुलगा जतीनने क्रीडा पत्रकार आनंद वासू यांच्यासह परांजपे यांच्या जीवनावरील ‘क्रिकेट द्रोणा’ हे पुस्तक लिहिले होते. यात भारतामधील अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी त्यांची कारकीर्द घडवण्यात परांजपे यांचे कसे योगदान होते, हे नमूद केले आहे. ऐंशीच्या दशकात ते खेळाडूंना जीवनाकडे पाहण्याचा धडा द्यायचे. परांजपे यांच्या पत्नी ललिता या रुईया महाविद्यालयात त्या वेळी इंग्रजी वाङ्मय विभागाच्या प्रमुख होत्या. माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरने आपल्या पुस्तकात परांजपे दाम्पत्याचे अनुभव मांडले आहेत. दादर युनियनमध्ये परांजपे यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी ललिता यांच्या शैक्षणिक तासिकांना मुकावे लागल्याचे त्याने म्हटले आहे.