जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारत अव्वल

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारत अव्वल

टोकियो ऑलिम्पिकमध्ये विविध खेळ प्रकारांत भारतीय खेळाडूंनी अभूतपूर्व पदकांची कमाई केली. त्यानंतर आता पोलंडमधील वॉरक्लॉ येथे झालेल्या १६ व्या जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आठ सुवर्ण पदकांसह एकूण १५ पदकांवर आपली नावे कोरली आहेत. यामुळे स्वातंत्र्यदिनी भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

१० ते १५ ऑगस्ट दरम्यान कंपाऊंड आणि रीकव्र्ह अशा दोन विभागांत ही स्पर्धा खेळवण्यात आली. यामध्ये भारताने एकूण आठ सुवर्ण, दोन रौप्य आणि पाच कांस्य पदके जिंकली. भारताची या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली असून पदक कमाईतही भारत अव्वल स्थानावर आहे.

पुरुषांच्या १८ वर्षांखालील कॅडेट गटात अमित कुमार, विकी रुहाल आणि बिशाल चेंगमय यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने फ्रान्सवर ५-३ अशी मात केली. तर मिश्र दुहेरीतील अंतिम फेरीत कोमलिका बारी आणि पार्थ साळुंखे यांच्या जोडीने जपानच्या जोडीवर ६-२ असा विजय मिळवला. त्याशिवाय २१ वर्षांखालील गटात पार्थ साळुंखे, आदित्य चौधरी आणि धीरज बोमादेवारा या भारतीय रीकव्र्ह संघाने सुवर्णपदक जिंकले. महिलांच्या कॅडेट गटात भारताला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.