काँग्रेसचे माजी आ. माणिकराव जगताप यांचे निधन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

काँग्रेसचे माजी आ. माणिकराव जगताप यांचे निधन

मुंबई : महाडचे माजी आमदार तथा प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचे रविवारी मध्यरात्री निधन झाले. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोविडची लागण झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जगताप यांच्या निधनाचे वृत्त महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आले आहे. कॉंग्रेस पक्षाने कर्तृत्ववान आणि उमदे नेतृत्व गमावल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी शोक व्यक्त केला आहे.
अशोक चव्हाण यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझे निकटचे सहकारी माणिकराव जगताप यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या रूपात काँग्रेस पक्षाचे कोकणातील एक कर्तृत्ववान नेतृत्व हरपले आहे.
आणखी एका ट्विटमध्ये चव्हाण म्हणाले की, माजी आमदार माणिकराव जगताप हे उत्तम संघटक होते, लोक प्रश्नांवर हिरीरीने काम करणारे नेते होते. त्यांच्या निधनाने काँग्रेसची मोठी हानी झाली असून, मी एक बंधुतुल्य मित्र गमावला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, ही प्रार्थना.

राजकीय कारकीर्द
विद्यार्थी काँग्रेसमधून जगताप यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये अनेक पदे भूषवली.  जगताप हे काँग्रेसचे विद्यमान रायगड जिल्हा अध्यक्ष होते. महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी याआधी आमदारकी भूषवली होती. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत ते महाड विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची धुराही त्यांच्या खांद्यावर होती.

महाड नगरपालिकेवर १५ ते २० वर्षे वर्चस्व होते. रायगड जिल्ह्यामध्ये सुनील तटकरे यांच्या वर्चस्वाला थेट आव्हान करणारे एकमेव राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळख होती. दक्षिण रायगडमध्ये प्रचंड जनमत असलेले कोकणातील काँग्रेसचे मोठे नेते होते. माणिकरावांची कन्या स्नेहल जगताप या महाडच्या नगराध्यक्षा आहेत.
१९९९ मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यानंतर ते राष्ट्रवादीत दाखल झाले होते. परंतु पुन्हा ते काँग्रेसमध्ये आले होते. रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचे काम जगताप यांनी केले होते.