आरआरआरचे ' दोस्ती ' गाणं पाच भाषांमध्ये दिमाखात प्रदर्शित

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

आरआरआरचे ' दोस्ती ' गाणं पाच भाषांमध्ये दिमाखात प्रदर्शित

जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत बाहुबली दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या बहुचर्चित, बहुप्रतीक्षित आणि बहुभाषी आरआरआर चित्रपटातील विशेष आणि पहिले गाणे ' दोस्ती ' रविवारी सामाजिक माध्यमांवर प्रदर्शित होणार आहे. तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत हे गाणं प्रदर्शित केले आहे.
या विशेष चित्रफितीत बाहुबली संगीत दिग्दर्शक तसेच प्रथितयश बहुमुखी-बहुभाषी कलाकार एम एम किरवाणी यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात पाच भाषेतील पाच आघाडीच्या गायकांनी वाद्यवृंदासह या विशेष गीतास आवाज दिला. याद्वारे आरआरआर चित्रपटातील संगीत कशा प्रकारचे असणार याची कल्पना चाहत्यांना आणि रसिकांना आली आहे. या गाण्यात रामचरण आणि ज्युनियर एनटीआर यांचाही समावेश आहे. या संगीतमय प्रस्तुतीस जगातील काना-कोप-यातून सामजिक माध्यमांवर शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव होतो आहे. ' आरआरआर ' साठी संगीत दिग्दर्शक एम एम किरवाणी यांच्या संगीताची चाहते वाट पाहत आहेत.
संगीत दिग्दर्शक एम एम किरवाणी यांच्यासह भारताचे पाच आघाडीचे गायक आरआरआरच्या विशेष संकल्पना गीत - थीम सॉन्गसाठी एकत्र आले आहे. हिंदी गाणे अमित त्रिवेदी, तमिळ अनिरुद्ध रविचंदर, मल्याळम विजय येसूदास, कन्नड याझिन निझार आणि तेलुगू गाण्यास हेमचंद्र यांनी आवाज दिला आहे. तर हिंदी गाणे रिया मुखर्जी, तमिळ मदन कार्की, कन्नड वरदराज, मल्याळम नकोंबू गोपाल कृष्णन आणि तेलुगू गीत सिरी वेन्नला सीतारामशास्त्री यांनी शब्दबद्ध केले आहे.
आरआरआरच्या संगीताचे अधिकार लहरी म्युजिक आणि टी सिरीज या संस्थांनी तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेसाठी प्राप्त केले आहे तर चित्रपटाची निमिर्ती, लायका प्रॉडक्शन, पेन इंडिया लिमिटेड, डीव्हीव्ही एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विध्यमाने केली जात आहे. काही दिवसांपूर्वी आरआरआर चित्रपटातील विशेष चित्रफीत रोअर ऑफ आरआरआर सामाजिक माध्यमांवर प्रदर्शित करण्यात आली आणि त्यास तुफान प्रतिसाद आणि प्रसिद्धी लाभत आहे.आरआरआर चे कार्य वेगाने सुरु आहे.दोन गाणे सोडून, सर्व प्रकारचे चित्रीकरण झाले आहे. रामचरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी दोन भाषेत काम पूर्ण केले असून उर्वरित कार्यही लवकरच पूर्ण होईल असे आरआरआर च्या चमूने काही दिवसांपूर्वी घोषित केले आहे.
प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत आणि देशव्यापी संचारबंदीनंतर केंद्र आणि राज्य सरकरच्या सर्व आरोग्य विषयक नियम आणि दिशानिर्देशांचे पालन करीत ' आरआरआर' चित्रपटाचे चित्रीकरण हैदराबाद- पुणे, गुजरात सह अन्य ठिकाणी घेण्यात आले. चित्रपट आता आता शेवटच्या टप्यात आला आहे. बाहुबलीच्या वैश्विक यशानंतर आरआरआर दहा भाषांमध्ये १३ ऑक्टोबरला प्रदर्शित केला जाणार आहे.



' आरआरआर ' अल्लुरी सीताराम राजू आणि कोमरम भीम या महान क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित सत्य घटनांवर एक काल्पनिक चित्रपट आहे. "राईज .. रोअर .. रिवोल्ट ... " अशी चित्रपटाची संकल्पना आहे. चित्रपटात अभिनेते ज्युनियर एनटीआर कोमरम भीम यांची भूमिका साकारणार आहेत तर रामचरण अल्लुरी सीताराम राजूंच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात आंतर-राष्ट्रीय स्तराचे तंत्रज्ञ-कलाकारही सहभागी आहेत. अभिनेत्री ओलिव्हिया मॉरिस, अॅिलिसन डूडी आणि रे स्टीव्हनसन राजामौली यांच्यासोबत काम करणार आहेत. चित्रपटात अभिनेते अजय देवगण, श्रिया सरण आणि आलिया भट यांचा देखील समावेश आहे. ' आरआरआर ' साठी संगीत एम एम किरवाणी यांचे असून सेंथिल कुमार छायाचित्रकार आहेत.  चित्रपटात अभिनेते ज्युनियर एनटीआर आणि राम चरण पहिल्यांदाच एकत्र आले असून बाहुबलीनंतर दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. अभिनेते ज्युनियर एनटीआर माजी मुख्यमंत्री आणि जेष्ठ अभिनेते नंदमुरी तारक रामराव उर्फ एनटीआर यांचे नातू आहेत तर रामचरण माजी केंद्रीय मंत्री आणि अभिनेते मेगास्टार चिरंजीवी यांचे पुत्र आहेत. यापूर्वी दोघांनी वेगवेगळ्या चित्रपटात दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्यासोबत काम केले आहे.