Delta Variant करोनाचा सर्वाधिक संक्रमण होणारा प्रकार; WHO चा इशारा!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

Delta Variant करोनाचा सर्वाधिक संक्रमण होणारा प्रकार; WHO चा इशारा!

करोनाच्या Delta Plus Variant ची चर्चा सध्या जगभर सुरू आहे. करोना विषाणूच्या या नव्या प्रकारामुळे प्रतिकारशक्ती वेगाने निष्प्रभ होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे जगभरातील देशांनी या प्रकाराची धास्ती घेतली असताना भारतातल्या १० राज्यांमध्ये प्रामुख्याने डेल्टा प्लसचे रुग्ण आढळत आहेत. त्यात महाराष्ट्रात सर्वाधित २० रुग्ण आत्तापर्यंत आढळून आल्यामुळे चिंता वाढली असतानाच आता जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा प्लसचा मूळ व्हेरिएंट असलेला डेल्टा व्हेरिएंट जगभरात आजपर्यंत सापडलेल्या विषाणूंमध्ये सर्वाधिक वेगाने संक्रमण होणारा विषाणू असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या जगभरातल्या नागरिकांनी देखील मास्क घालून ठेवणं आवश्यक असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.

८५ देशांमध्ये Delta चे रुग्ण!

जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO चे प्रमुख डॉ. टेड्रॉस यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचं गांभीर्य विषद केलं. “पहिल्यांदा भारतात आढळून आलेल्या करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचे जगातल्या जवळपास ८५ देशांमध्ये रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत सापडलेल्या करोना व्हेरिएंटमध्ये हा प्रकार सर्वाधिक वेगाने संक्रमण होणारा प्रकार आहे. आपण सगळ्यांनी सार्वजनिक आरोग्य आणि करोनासंदर्भातल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे. त्यासोबतच या विषाणूला थांबवायचं असल्यास जगातल्या सर्वच देशांमध्ये समान पद्धतीने लसींचा पुरवठा व्हायला हवा”, असं टेड्रॉस यावेळी म्हणाले.