नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असावं – राज ठाकरे

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असावं – राज ठाकरे

मुंबई : नवी मुंबई विमातनतळ नामकरणावरुन सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारने विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा निर्णय घेतला असताना स्थानिकांकडून दि बा पाटील यांचं नाव देण्याची मागणी होत आहे. दरम्यान या वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं असून नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असावं असं मत मांडलं आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट घेतल्यानंतर मुंबईतील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याची मागणी आहे. तर बाळासाहेबांचं नाव देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यातून संघर्ष होत असून पाठिंबा मागण्यासाठी माझ्याकडे प्रशांत ठाकूर आले होते,” अशी माहिती राज ठाकरेंनी दिली.कोणतंही विमानतळ जेव्हा येतं तेव्हा ते शहराच्या बाहेर येतं. त्यामुळे तेव्हाच्या मुंबईप्रमाणे ते सांताक्रूझमध्ये आलं. नंतर वाढवत ते सहारपर्यंत गेलं आणि त्याला सांताक्रूझ आणि सहार विमानतळ असं नाव मिळालं. नवी मुंबईच्या विमानतळाचा प्रस्ताव आला तेव्हा मला आत्ताचं विमानतळ देशांतर्गत आणि ते विमानतळ आंतरराष्ट्रीय होणार अशी माहिती देण्यात आली होती. ते जरी नवी मुंबईत, पनवेलमध्ये होत असलं तरी ते मुंबई विमानतळच असणार आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळच नाव राहणार असं मला वाटतं. हे सध्याच्या देशांतर्गंत विमानतळाचा विस्तारित भाग आहे. हा महाराष्ट्र असून मुंबई राजधानी आहे. परदेशातून व्यक्ती महाराष्ट्रात येतो तेव्हा शिवरायांच्या भूमीत येतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळालाही शिवरायांचं नाव असेल असं मला वाटतं,” असं राज ठाकरेंनी सांगितलं आहे. “हे काही सिडकोनं मंजूर केलं नी राज्यानं प्रस्ताव केला असं नाही. हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे होणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ छत्रपती शिवाजी महाराजांच्याच नावाने होईल. बाळासाहेब किंवा दि. बा. पाटील यांच्या मोठपणाबद्दल दुमत नाही,” असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.