सार्वजनिक गणेशोत्सवाला सरकारच्या उदासीनतेचा फटका ; आशिष शेलारांची टीका

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सार्वजनिक गणेशोत्सवाला सरकारच्या उदासीनतेचा फटका ; आशिष शेलारांची टीका

मुंबई  :  राज्यातील करोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असून २५ जिल्ह्यांमधील निर्बध राज्य सरकारकडून शिथिल करण्यात आले आहेत. मात्र करोनाचं संकट अद्यापही पूर्णपणे टळलं नसल्याने राज्य सरकार वारंवार खबरदारी घेण्याचं आवाहन करत आहे. दरम्यान यावर्षीही गणेशोत्सव उत्सव निर्बंधातच साजरा करावा लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

मंदिरे बंद आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवाला सरकारच्या उदासीनतेचा फटका बसला आहे. दरवर्षी परवानगी घेणाऱ्या ३ हजार मंडळांपैकी केवळ १९७ अर्ज दाखल झाले. तसेच कोकणात जाणाऱ्यांना अद्याप स्पष्टता दिलेली नाही. ठाकरे सरकारच्या वैशाख वणव्याच्याकारभाराने सणांच्या श्रावण मासात ही जनतेच्या चेहऱ्यावर ना हर्ष, ना आनंद!अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

गणेशोत्सवाला अवघा एक महिना राहिला असताना यावर्षी आतापर्यंत मुंबई महापालिकेकडे गणेशोत्सव मंडळांचे केवळ १९७ अर्ज दाखल झाले आहेत. महापालिकेने गणेशोत्सवाच्या परवानगीसाठी १४ जुलैपासून अर्ज मागवण्यास सुरुवात केली होती.  परंतु केवळ १९७ अर्ज आले आहेत. करोनासाथीच्या संकटामुळे गणेशोत्सव मंडळात अद्याप निरुत्साह असल्याचे आढळते.

मुंबईत साधारणत: ११ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यापैकी जी मंडळे रस्त्यावर मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करतात अशा मंडळांना पालिकेची परवानगी घ्यावी लागते. अशी साधारण तीन हजार मंडळे दरवर्षी पालिकेकडे परवानग्यांसाठी खेटे घालत असतात. दरवर्षी ही संख्या वाढत जाते. दरवर्षी पालिकेकडे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अडीच ते पावणे तीन हजार अर्ज येतात. यंदा मात्र परवानग्या सुरू केल्यापासून गेल्या पाऊण महिन्यात १९७ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.