राज्यात दीड कोटी नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण; देशात महाराष्ट्र आघाडीवर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राज्यात दीड कोटी नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण; देशात महाराष्ट्र आघाडीवर

महाराष्ट्राने करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये लक्षणीय कामगिरी केली आहे. राज्यात आतापर्यंत तब्बल दीड कोटी नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन झाले आहेत. राज्यातील तब्बल एक कोटी ५३ लाख ७८ हजार ४५० नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्याच्या आरोग्य यंत्रणेचं अभिनंदन केलं आहे. विशेष म्हणजे देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात दोन्ही डोस पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. तर शुक्रवारी (२८ ऑगस्ट) एका दिवसात विक्रमी नोंद करत राज्यात सुमारे १० लाख नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी आरोग्य यंत्रणेचं कौतुक करताना म्हटलं आहे कि, “आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी घेतलेले कष्ट हे निश्चितच प्रशंसनीय आहेत.” त्याचप्रमाणे, राज्यात दर दिवशी १० लाखांपेक्षा जास्त नागरिकांचं देखील लसीकरण केलं जाऊ शकतं. गेल्या काही दिवसांच्या लसीकरणाच्या आकडेवारीवरून हे अगदी स्पष्ट झालं आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, १४ ऑगस्ट रोजी ९ लाख ६४ हजार ४६० नागरिकांना लस देण्यात आली होती राज्याने २१ ऑगस्ट रोजी हा विक्रम मोडून काढत ११ लाख ४ हजार ४६४ नागरिकांचे लसीकरण करून विक्रमी कामगिरी केली. तर, शुक्रवारी (२७ ऑगस्ट) राज्यात ९ लाख ९० हजार इतक्या मोठ्या संख्येने लसीकरण करण्यात आला आहे.

ऑक्टोबर महिन्यापर्यंत करोनाची तिसरी लाट?

केंद्रीय गृह विभागांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेने (NIDM) पंतप्रधान कार्यालयाकडे नुकताच एक अहवाल सुपूर्द केला आहे. करोनाची तिसरी लाट ऑक्टोबर महिन्यापर्यंत येऊ शकते, असा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने ४० तज्ज्ञांशी बोलून केलेल्या सर्व्हेचा हवाला यात देण्यात आला आहे. त्यामुळे, १०० टक्के लसीकरण पूर्ण होईपर्यंत खबरदारी म्हणून करोना प्रतिबंधक सर्व नियमांचं पालन करणं प्रत्येकासाठीच अनिवार्य असणार आहे.