महाराष्ट्रासह बिहार, गोवा, कर्नाटकातही पूरस्थिती

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

महाराष्ट्रासह बिहार, गोवा, कर्नाटकातही पूरस्थिती

मुंबई  : मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि बिहारमध्ये पूरस्थिती निर्माण झालीय. तर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही स्थिती आणखी भयानक होण्याची भीती आहे. महाराष्ट्रासोबतच शेजारच्या गोव्यातही पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. गोव्यातील एक हजाराहून अधिक घरांना पुराचा फटका बसला आहे. तर हजारो लोक बेघर झाली आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. तसेच पुराचा फटका बसलेल्या लोकांना तात्काळ मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. राज्यातील पूरग्रस्तांची सरकारी शाळांमध्ये तात्पुरती सोय करण्यात आली आहे. तसेच खाणं-पिणे आणि औषधांची व्यवस्था करण्यात आली आहे.
बिहारमधील 11 जिल्ह्यात पूरसदृश्य स्थिती आहे. बिहारमधील गोपालगंज, पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, सारण, शिवहर, सीतामढी, मुजफ्परपूर, दरभंगा, खगडिया आणि मधुबनी जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. बिहारमध्ये आतापर्यंत 11 लाखांहून अधिक जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. बिहारमध्ये एनडीआरएफच्या  7 आणि एसडीआरएफच्या 9 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तर कर्नाटकमध्ये गंगावल्ली आणि काली नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे कन्नड जिल्ह्याला पुराचा फटका बसला आहे. या भागात भारतीय तटरक्षक दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने आतापर्यंत 100 हून अधिक जणांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात आले आहे. तर अंकोला तालुक्यात पूरसदृश्य स्थिती आहे. नदीकाठच्या 15 गावांना धोक्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.