महाराष्ट्र शासन अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी; मंत्री उदय सामंत यांची माहिती

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

महाराष्ट्र शासन अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी; मंत्री उदय सामंत यांची माहिती

तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तेथील नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. तर, महाराष्ट्रातही अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबीयांची चिंता सतावत आहे. शिवाय, आपण घऱी कसे परतणार हा देखील अनेकांसमोर प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यासोबत अफगाणिस्तानातून महाराष्ट्रात शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांपुढेही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज राज्यातील काही अफगाणी विद्यार्थ्यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली व त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. यानंतर उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र शासन या विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे.

“अफगाणिस्तानातील मुलं आपल्या राज्यात शिकत आहेत त्यामुळे त्याच्याकडे सहानुभूतीपूर्वकच बघितलं पाहिजे. महाराष्ट्राचा एक वेगळा आदर्श त्यांच्या देशासमोर आणि जगासमोर उभा राहिला पाहिजे. सर्व विद्यापिठे एकत्र येऊन या विद्यार्थ्यांना मदत करतील. त्यांना कुठेही असे वाटणार नाही की आपण परदेशामध्ये शिकालयला आलो आहोत. महाराष्ट्र सरकार त्या विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही,” असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

“या विद्यार्थ्यांना काय मदत करू शकतो यावर आज चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र राज्याच्या परंपरेंनुसार मी त्या विद्यार्थ्यांना शब्द दिला आहे की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. पुण्यात शिकायला येणाऱ्या ५४१ विद्यार्थ्यांना कसे आणता येईल याचा प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारने जर अफगाणिस्तानातील मुलांना शिकवण्याची परवानगी दिली तर त्यांच्या राहण्याचा आणि खाण्याचा खर्च करण्याची तयारी काही महाविद्यालयांनी दर्शवली आहे. महाराष्ट्र शासन अफगाण मुलाच्या पुर्णपणे पाठीशी राहील,” असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.