मुंबईत सोमवारी शासकीय व सार्वजनिक केंद्रावर फक्त महिलांसाठी लसीकरण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबईत सोमवारी शासकीय व सार्वजनिक केंद्रावर फक्त महिलांसाठी लसीकरण

कोविड 19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड 19 लसीकरण केंद्रांवर, सोमवार दिनांक 27 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत, फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण सत्र राबवले जाणार आहे.

तसेच, मंगळवार दिनांक 28 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या पहिल्या सत्रात, शिक्षक तसेच 18 वर्ष व त्यावरील वयाचे विद्यार्थी यांचे कोविड लसीकरण होईल. याच दिवशी दुसऱया सत्रात म्हणजे दुपारी 3 ते रात्री 8 यावेळेत, दुसरी मात्रा (डोस) देय असणाऱया नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या दुपारच्या सत्रात कोणालाही कोविड लसीचा पहिला डोस दिला जाणार नाही.

महिला तसेच शिक्षक व विद्यार्थी यांना पहिली किंवा पहिली मात्रा घेऊन विहित कालावधी पूर्ण झाला असेल तर (कोविशिल्‍ड संदर्भात पहिल्या डोसनंतर 84 दिवस आणि कोव्‍हॅक्‍सीन असल्यास पहिल्या डोसनंतर 28 दिवस पूर्ण झाल्‍यास) दुसरी मात्रा देखील घेता येईल. त्याचप्रमाणे, दुसरी मात्रा घेण्यासाठी येणाऱयांना, पहिला डोस घेतला असल्याचे प्रमाणपत्र देखील सोबत आणणे आवश्यक असेल.

या दोन्ही दिवशी, मुंबईतील सर्व शासकीय व महानगरपालिका लसीकरण केद्रांवर थेट येवून (वॉक इन) संबंधित घटकातील पात्र नागरिकांना लस घेता येईल. त्यासाठी ऑनलाईन पूर्व नोंदणीची आवश्यकता नाही. पात्र लाभार्थ्यांनी येताना, शासकीय ओळखपत्र आणणे आवश्यक असेल. तसेच शिक्षक व विद्यार्थी यांनी शैक्षणिक संस्थांचे ओळखपत्र देखील सोबत आणणे आवश्यक आहे.

कोविड 19 विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगाने आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका देखील प्रयत्नशील आहे. त्यासाठी या विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. कोविड १९ विषाणू प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने कोविड लसीचे दोन्ही डोस घेवून लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. सबब, पात्र नागरिकांनी सदर सत्राचा जास्‍तीत जास्‍त प्रमाणात लाभ घ्यावा, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन करण्‍यात येत आहे.