मुंबईत उद्यापासून गर्भवती महिलांचे लसीकरण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबईत उद्यापासून गर्भवती महिलांचे लसीकरण

मुंबई : केंद्राने दिलेल्या परवानगीनुसार आता मुंबईत गुरुवारपासून गर्भवती महिलांसाठी करोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू केले जाणार आहे. शहरातील प्रसूतिगृहांसह ३१ केंद्रांवर लसीकरण उपलब्ध असणार असून यासाठी लसीकरण केंद्रांवरील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सध्या सुरू आहे.

करोना प्रतिबंधात्मक लस गर्भवती महिलांना देण्याची परवानगी केंद्रीय आरोग्य विभागाने नुकतीच दिली असून याची मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर केली आहेत. गर्भवती महिलांना करोनाची बाधा झाल्यानंतर होणारे संभाव्य धोके आणि लसीकरणाचे फायदे या दोन्हीची माहिती दिली जावी. गर्भवती महिलेने लस घेण्याचा निर्णय हा प्रसूतिकाळात लसीकरणाचे माहीत नसलेले दुष्परिणाम आणि करोनामुळे  होणारा धोका यावरून  घ्यावा, असे यात आरोग्य  विभागाने स्पष्ट  केले आहे.

त्यामुळे लशीबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. यावर संभाव्य धोके लक्षात घेता ही लस घेणे गरजेचे आहे असे तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

राज्याच्या सूचनेनुसार आता मुंबईत गर्भवती महिलांचे लसीकरण पालिका सुरू करणार असून याची तयारीही पालिकेने सुरू केली आहे. पालिकेच्या ३१ केंद्रांवर गुरुवारपासून लसीकरण सुरू केले जाणार असून यात प्रामुख्याने प्रसूतिगृह, उपनगरीय रुग्णालयांचा समावेश आहे.

या ठिकाणी पूर्वनोंदणी करता लसीकरणासाठी येण्याची मुभा या महिलांना देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी  दिली.

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

लसीकरण केंद्रांवरील संबंधित कर्मचाऱ्यांना गर्भवती महिलांना लसीकरणानंतर काही दुष्परिणाम झाल्यास कसे उपचार द्यावेत याचे प्रशिक्षण देण्याच्या सूचना मार्गदर्शक तत्त्वामध्ये दिलेल्या आहेत. यानुसार सर्व पालिका केंद्रांवरील कर्मचाऱ्यांचे सोमवारपासून तीन दिवसांचे प्रशिक्षण सुरू केले आहे. गर्भवती महिलांना लसीकरणाच्या फायद्यांची आणि होणाऱ्या सौम्य दुष्परिणामांची माहिती देणे, गंभीर परिणाम जाणवल्यास तातडीने कळविण्याबाबत सूचना देणे, लशीबाबत असलेल्या अनेक शंकांचे निरसन करणे याचेही प्रशिक्षण दिले जाणार आहे.