निर्बंध लागले तर संपूर्ण महाराष्ट्रात लागतील; विजय वडेट्टीवारांचं नागपुरात विधान

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

निर्बंध लागले तर संपूर्ण महाराष्ट्रात लागतील; विजय वडेट्टीवारांचं नागपुरात विधान

करोनाची तिसरी लाट येण्याची संभाव्य भीती असल्याने राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लावण्यासंबंधी सध्या चर्चा रंगली आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळात संभाव्य गर्दी टाळण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने पुन्हा निर्बंध कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची नियमावली दोन-तीन दिवसांत जाहीर करण्यात येण्याचे संकेत आहेत. दरम्यान नियमावली जाहीर होण्याआधीच नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी कठोर निर्बंध लागू होतील अशी घोषणा केली. मात्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री यांनी हा दावा फेटाळला आहे. यामुळे काँग्रेस नेत्यांमध्येच दुमत असल्याचंही समोर आलं आहे.

तिसरी लाट थोपवण्यासाठी निर्बंध कठोर करण्याबाबतची नियमावली जाहीर होण्याआधीच नितीन राऊत यांनी सोमवारी सायंकाळी तातडीने पत्रकार परिषद घेतली. शहरात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवून दोन- तीन दिवसांनंतर पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याची घोषणा त्यांनी केली.

गणेशोत्सवात निर्बंध!

जी आकडेवारी समोर आली आहे ती लक्षात घेता शहरात आणि ग्रामीण भागात पुन्हा कडक निर्बंध लावावे लागणार आहेत. एकेरी आकडा आता दुहेरी झाला असून १३ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आपण पावलं टाकत आहोत,” असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.

नितीन राऊत यांनी याआधी ऑगस्टला मुख्यमंत्र्यांनी जाहीर करण्यापूर्वीच नागपुरातील खासगी शिकवणी वर्ग दुकानांच्या वेळेत वाढ करण्याची घोषणा केली होती.

विजय वडेट्टीवारांनी फेटाळला दावा

दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना नितीन राऊत यांचा दावा फेटाळला आहे. “निर्बंध कडक करणारच अशी भूमिका कोणी स्वीकारलेली नाही. पण मुख्यमंत्र्यांनी सूतोवाच केलं आहे. तिसरी लाट येत असून जर लोकांनी सहकार्य केलं नाही, गर्दीपासून दूर राहिले नाही तर संभाव्य धोका लक्षात घेता निर्बंध कडक करावे लागतील असं त्यांचं मत आहे. नितीन राऊत यांनी पालकमंत्री म्हणून नागपूरबाबत भाष्य केलं असेल. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली असेल पण मला माहिती नाही. पण निर्बंध लागले तर एकट्या नागपुरात नाही तर महाराष्ट्रात लागतील. शेवटी रुग्णसंख्येवरच सर्व अवलंबून आहे,” असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.