नाट्यसमीक्षक जयंत पवार यांचे निधन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नाट्यसमीक्षक जयंत पवार यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, नाट्यसमीक्षक, लेखक जयंत पवार यांचे शनिवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. पवार यांना रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी पत्रकार, लेखिका संध्या नरे आणि मुलगी असा परिवार आहे.

नाटककार आणि लेखक अशी अवीट छाप त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पाडली होती. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या स्पर्धेत 'काय डेंजर वारा सुटलाय' या नाटकासाठी पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले होते. जानेवारी २०१४ मध्ये महाड येथे झालेल्या १५ व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. 'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' या कथासंग्रहासाठी २०१२ च्या साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.

पवार यांनी लिहिलेल्या नाटक आणि कथांनी मराठी साहित्यात वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या ‘अधांतर’ या नाटकावर ‘लालबाग परळ’ हा मराठी चित्रपट बनला आहे. तसेच ‘चंदूच्या लग्नाची गोष्ट’ या कथेवर ‘रज्जो’ हा हिंदी चित्रपट बनवण्यात आला आहे.

अधांतर, टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन (दीर्घांक), दरवेशी (एकांकिका), पाऊलखुणा (वंश या नाटकाचे व्यावसायिक रूप), फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह), बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक (भाषाविषयक), माझे घर, वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा (कथासंग्रह), वंश, शेवटच्या बीभत्साचे गाणे (दीर्घांक) होड्या (एकांकिका) या त्यांच्या कलाकृती सर्वांच्या स्मरणात राहतील. त्यांनी १५ एकांकिका लिहिल्या आहेत. कार्य सिद्धीस जाण्यास समर्थ आहे, होड्या, घुशी या त्यांच्या एकांकिकेचे शेकडो प्रयोग झाले आहेत.