दोन डोस घेतलेल्या मुंबईकरांना कसा मिळणार लोकल प्रवासाचा पास? महापौरांनी केली महत्त्वपूर्ण घोषणा!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

दोन डोस घेतलेल्या मुंबईकरांना कसा मिळणार लोकल प्रवासाचा पास? महापौरांनी केली महत्त्वपूर्ण घोषणा!

सामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी दिली जावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. विरोधकांकडून यासाठी आंदोलन देखील केलं गेलं. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना मुंबईच्या लोकलमधून प्रवासाची परवानगी दिल्याची घोषणा केली. येत्या १५ ऑगस्टपासून हा निर्णय लागू असणार आहे. मात्र, नेमकी प्रवासाची परवानगी कशी मिळेल, मुंबईकरांना पास कसा आणि कुठे मिळेल, मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेलं मोबाईल अॅप कधी सुरू होणार? याविषयी मुंबईकरांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. त्यावर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. येत्या दोन दिवसांत मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी नोंदणीचं मोबाईल अॅप तयार केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

मुंबईतल्या ६५ रेल्वे स्थानकांवर मिळणार पास!

राज्य सरकार आणि रेल्वे मिळून ही योजना केली जात आहे. मुंबईतल्या ६५ रेल्वे स्थानकांवर लोकांना क्यूआर कोड मिळणार आहे. दिवसांत त्या मोबाईल अॅपची निर्मिती केली जाईल. ३२ लाख प्रवाशांसाठी या अॅपची निर्मिती केली जात आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांना प्रवासाची मुभा दिली जाणार आहे”, असं महापौर म्हणाल्या.

रेल्वे स्थानकांवर हुज्जत घालू नका

दरम्यान, यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना रेल्वे स्थानकांवर हुज्जत घालण्याचं देखील आवाहन केलं आहे. “दुसरा डोस घेऊन झाल्यानंतर १५ दिवसांनी पास मिळू शकणार आहे. त्यामुळे तिकीट खिडक्यांवर हुज्जत घालू नका. दुसरा डोस घेतल्यानंतर लगेच पास मिळणार नाही. कोणताही नियम तुमच्यासाठी केला जातो. त्यासाठी पालिका आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून अॅफ तयार केलं जात आहे”, असं त्या म्हणाल्या.

रेल्वे स्थानकांवर तीन गोष्टी मिळणार!

दोन डोस घेऊन १५ दिवस उलटलेल्या मुंबईकरांना रेल्वे स्थानकांवर प्रवासाची परवानगी म्हणून तीन गोष्टी दिल्या जातील, अशी माहिती महापौरांनी यावेळी दिली. “सर्व ६५ रेल्वे स्थानकांवर सिस्टीमच्या माध्यमातून तिकीट, पास आणि क्यूआर कोड अशा तीन गोष्टी मिळतील. रांगा लागल्या तरी हरकत नाही. पण रांगा लावताना स्वत:ची काळजी घ्या. डबल मास्क लावा”, असं त्या म्हणाल्या.

आत्ता आपल्याकडे मुंबईत दोन्ही डोस झालेले १९ लाख लोक आहेत. उपनगर मिळून ही संख्या ३२ लाखांवर आहे. पण दररोज साधारण प्रवास करणाऱ्यांची संख्या ८० लाख आहे. लसीचा पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत”, असं देखील महापौर यावेळी म्हणाल्या.