'...तर राजकीय संन्यास घेईन', भाजपाच्या आरोपानंतर उदय सामंत यांचं विधान

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

'...तर राजकीय संन्यास घेईन', भाजपाच्या आरोपानंतर उदय सामंत यांचं विधान

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर त्यांच्याविरोधात संपूर्ण शिवसेना एकवटल्याचे पाहायला मिळाले, तर भाजपा नारायण राणेंच्या मागे ठामपणे उभा राहिलेला दिसत आहे. यातच सिंधुदुर्गमध्ये जमाव बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेला ब्रेक लावण्यासाठी ही जमाव बंदी लागू केल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

दरम्यान, नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेसाठी जमाव बंदी लागू करण्यात आली नाही, असे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. तसेच, नारायन राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेमुळे मी जमाव बंदीचे आदेश दिले, हे सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेईन, असे विधान उदय सामंत यांनी केले आहे.

उदय सामंत आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. यावेळी उदय सामंत एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते. ते म्हणाले,"कोणाचा तरी दौरा आहे म्हणून आहे म्हणून मी रत्नागिरी दौऱ्यावर आहे, असे काही नाही, तो केवळ योगायोग समजावा. गेली तीन दिवस मी रत्नागिरी जिल्ह्यात आहे. जन आशीर्वाद यात्रेच्या वेळापत्रकाला अनुसरून आम्ही दौरे लावले नाहीत. तसेच कालची जी कारवाई होती ती कायदेशीर होती."

उद्धव ठाकरे यांच्याबाबत अभिमान
प्रत्येकाला त्याचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. परंतु हा पक्ष वाढवत असतांना प्रत्येकाला प्रत्येकाच्या नेत्याचा अभिमान असतो. तसा आम्हाला उद्धव ठाकरे यांच्याबाबत अभिमान आहे. गर्व देखील आहे. मुख्यमंत्री म्हणून ते अतिशय चांगल काम करत आहेत. कदाचित देशाच्या क्रमवारीत पहिल्या पाच क्रमांकामध्ये उद्धव ठाकरे आल्यामुळे काही लोकांना ते आवडले नसेल, असे उदय सामंत म्हणाले.

'...तर राजकीय संन्यास घेईन'
जन आशिर्वाद यात्रेला ब्रेक लावण्यासाठी जमाव बंदी लागू केल्याचा आरोपावर उदय सामंत यांनी भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, भाजपाने खोटे आरोप केले आहेत. याचे पुरावे सिद्ध झाल्यास मी राजकीय संन्यास घेईन, असे सामंत म्हणाले. जिल्हाधिकाऱ्यांना स्वायत: अधिकार आहेत ते प्रशासनाचे प्रमुख आहेत. जिल्हादंडाधिकारी देखील आहे, त्यामुळे त्यांना वाटले असेल की कलम १४४ सिंधुदुर्गमध्ये लावणे आवश्यक आहे. ते गणपतीच्या पार्श्वभूमीवर किंवा इतर कोणत्या पार्श्वभूमीवर असेल, असे उदय सामंत यांनी सांगितले.