“अजितदादा आमच्या लोकांना नाराज करू नका, नाहीतर गडबड होईल”, शिवसेना खासदार संजय राऊतांचं विधान!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

“अजितदादा आमच्या लोकांना नाराज करू नका, नाहीतर गडबड होईल”, शिवसेना खासदार संजय राऊतांचं विधान!

राज्यात महाविकासआघाडीचं सरकार आल्यापासून सत्तेतील तिन्ही पक्षांमध्ये विसंवाद असल्याची टीका विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून केली जाते. अशा काही प्रसंगी हे मतभेद दिसून देखील आले आहेत. त्यामुळे राज्यातील सरकार अस्थिर असल्याचं विरोधकांकडून सातत्याने बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी आज पुण्यातील भोसरी येथे शिवसेनेच्या एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्किल सल्ला दिला आहे. “अजित दादा, आमचं ऐका, नाहीतर गडबड होईल”, असं संजय राऊत यांनी म्हणताच सभागृहात हास्याची लकेर उमटली!

पिंपरी-चिंचवडमध्ये महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे या ठिकाणी संजय राऊतांनी केलेल्या विधानाचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. “पालकमंत्री आपले नाहीत. राज्यात जरी सत्ता असली, तरी या भागात आपलं कुणी ऐकत नाही असं म्हणतात. पण असं होता कामा नये. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. अजित पवार देखील उपमुख्यमंत्री आहेत. ते मुख्यमंत्र्यांचं ऐकतात. आपण त्यांना सांगू, दादा ऐकलं तर बरं होईल. नाहीतर मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत आज”, अशी मिश्किल टिप्पणी संजय राऊत यानी यावेळी केली.

“आम्हाला दिल्लीवर राज्य करायचंय”

मात्र, लागलीच त्यावर खुलासा करताना संजय राऊतांनी मुद्दा मांडला. “मुख्यंमत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले आहेत. कारण उद्या आम्हाला दिल्लीवर देखील राज्य करायचं आहे. साऊथ ब्लॉक, पंतप्रधान कुठे बसतात, गृहमंत्र्यांचं कार्यालय कुठे आहे, तिथे आपल्याला टप्प्याटप्प्याने पोहोचायचं आहे. या सगळ्याचा अंदाज घ्यायला मुख्यमंत्री दिल्लीत आहे. त्यामुळे अजित पवारांना आम्ही सांगू की आमच्या लोकांचंही ऐकत जा तुम्ही, आमच्या लोकांना नाराज करू नका, नाहीतर गडबड होईल”, असं राऊत यावेळी म्हणाले.

आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर…!

“आघाडी होईल का, नाही झाली तर काय? त्या भानगडीत कशाला पडायचं आपण? आपल्याला एकट्यानं लढण्याची सवय आहे. आलात तर तुमच्याबरोबर, नाहीतर तुमच्या शिवाय. कशाकरता आपण रेंगाळत बसायचं. आपण सगळ्या जागांची तयारी केली पाहिजे. उद्या आपल्यासमोर चर्चेला बसतील. मग या घ्या, त्या घ्या. आपण सन्मानाने आघाडी करण्याचा प्रयत्न करू. पण स्वाभिमान सोडून भगव्या झेंड्याशी तडजोड आपण करणार नाही हे लक्षात घ्या. एकदा ठरलं लढायचं म्हटल्यावर आपण लढू”, असं देखील संजय राऊत यांनी भोसरीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांना सांगितलं.