जोकोव्हिचला २०व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाचे वेध!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

जोकोव्हिचला २०व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाचे वेध!

अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिचने ३०व्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली असून त्याने आता २०वे ग्रँडस्लॅम जेतेपदाचे लक्ष्य बाळगले आहे. विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या रविवारी रंगणाऱ्या अंतिम फेरीत जोकोव्हिचसमोर इटलीच्या माटिओ बेरेट्टिनी याचे आव्हान असणार आहे.

जोकोव्हिचने बेरेट्टिनीवर मात केल्यास, सहाव्या विम्बल्डन जेतेपदासह तो सर्वाधिक २० ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावणाऱ्या रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्या विक्रमाशी बरोबरी साधेल. या मोसमात ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच जेतेपद पटकावल्यानंतर विम्बल्डनच्या जेतेपदासाठीही त्याचेच पारडे जड मानले जात आहे.

जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेला बेरेट्टिनी हा विम्बल्डनची अंतिम फेरी गाठणारा  इटलीचा पहिला टेनिसपटू ठरला आहे. त्याने जेतेपदाला गवसणी घातल्यास, एड्रियाने पानाट्टा यांच्यानंतर ग्रँडस्लॅम (१९७६, फ्रेंच) जिंकणारा तो इटलीचा दुसरा टेनिसपटू ठरेल. बेरेट्टिनीने जोकोव्हिचविरुद्धच्या दोन लढती गमावल्या असल्या, तरी हिरवळीवर त्याने अलीकडे चांगली कामगिरी केली आहे. इटलीचा फुटबॉल संघ लंडनमध्येच युरो चषकाची अंतिम फेरी खेळणार असल्याने इटलीवासीयांसाठी ही दुहेरी पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे सेंटर कोर्टवर बेरेट्टिनीला १५ हजार चाहत्यांचा पाठिंबा लाभण्याची शक्यता आहे.