कोरोना, दहिहंडी आणि राजकारण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कोरोना, दहिहंडी आणि राजकारण

दहिहंडी हा उत्सव महाराष्ट्राच्या उत्सव प्रिय पंरपरेला साजेसाच आहे आणि दरवर्षी दहिहंडीच्या थरांच्या थरथराटाची महाराष्ट्र वाट पहात असतो. गोविंदांचा उत्साह या दिवसात उतू जात असतो आणि गोविंदा पथके महिनोमहिने दहिहंडीच्या थरांचा सराव करत असतात. गेल्या दोन वर्षांपासून मात्र या थराराला कोरोनाची दृष्ट लागली आहे. गेल्या वर्षीपासून दहिहंडी होऊ शकली नाहि. कोरोनाची साथ हेच त्याचे कारण आहे. यंदाही कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या शक्यतेने राज्य सरकारने दहिहंडीचे थर लावण्यास मनाई केली आहे. परंतु मनसेने यास आक्षेप घेतला आहे आणि त्याविरोधात आंदोलनही सुरू केले आहे. मनसेला या विषयावरून शिवसेनेची कोंडी करायची आहे, हे उघड आहे. वास्तविक, शिवसेना हा पूर्वी प्रखर हिंदुत्ववादी पक्ष मानला जायचा. निदान तसे शिवसेना नेते भासवायचे तरी. पण शिवसेनेला कोरोनाच्या कारणास्तव बहुतेकसे सण साजरे करण्यास मनाईच केली आहे. शिवसेनेच्या सणांच्या उत्साहावर विरजण घालण्यामुळे महाराष्ट्रात जास्त संताप व्यक्त होत आहे. याचे कारण म्हणजे पूर्वी हीच शिवसेना याच सणांसाठी कमालीची आक्रमक आणि आग्रही होती. म्हणून शिवसेनेला आता काँग्रेसशी युती केल्याने सणांचा आग्रह अडचणीच वाटतो आहे की काय, अशी शंका मनसे आणि भाजपला आहे. शिवसेनेचे हेच वैचारिक अवघडलेपण जास्तीत जास्त उघ़डे पाडण्याचा मनसेचा डाव आहे. आणि त्यात मनसे मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली आहे, असे म्हणता येईल. खुद्द शिवसैनिकांची अडचण झाली आहे. कारण त्यांनीही दहिहंडीच्या विषयावर मोठमोठ्या दहिहंडी आयोजित करून हिंदू मतांची बेगमी केली होती. आता त्यांना ते शक्य होणार नाहि. मनसे आणि भाजपने केवळ शिवसेनेला या विषयावर टार्गेट केले आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष विरूद्ध शिवसेना असे चित्र तयार करण्यात यशस्वी ठरले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हेही पक्ष सत्तेत आहेत. परंतु कोणत्याही धार्मिक मुद्यांवर शिवसेनेला लक्ष्य केले जाते कारण शिवसेनाच धार्मिक मुद्यांवर पूर्वी आग्रही होती. यातून जास्तीत जास्त नुकसान हे शिवसेनेचे होणार आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेची शक्यता कितपत आहे, हे कुणालाच माहित नाहि. पण त्यामुळे शिवसेनेला लक्ष्य करण्याची संधी विरोधकांना मिळाली आहे. याला कारण अर्थातच मुख्यमंत्रि ठाकरे यांचे बोटचेपेपणाचे धोरणच आहे. कोरोनाच्या लाटेची भीती आहे तर ती लोकांच्यासमोर स्पष्ट मांडण्यात त्यांना यश आलेले नाहि. दहिहंडी खेळताना गोविंदा एकमेकांच्या अगदी जवळून दहिहंडी फोडत असतात आणि एकमेकांच्या अंगावरच उभे असल्याने कोरोना संसर्गाची भीती आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. त्यात जरूर तथ्य आहे. परंतु शिवसेनेचे नेते ज्या आवेशात बोलतात, त्यावरून ते मुद्दाम हिंदूंना डिवचण्यासाठी असे बोलत आहेत, असा निष्कारण गैरसमज होतो. न्यायालयाने दहिहंडीचे नऊ थर लावण्यास मनाई केली होती तेव्हाही मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. दहिहंडी हे पूर्वी राजकारण्यांचे गर्दी आणि नंतर निवडणुकीत मते गोळा करण्याचे महत्वाचे शस्त्र होते. त्यासाठी मराठी सेलेब्रिटींना नाचवण्याचे प्रकारही झाले. रात्री बारा बारा वाजेपर्यंत दहिहंडी चालायची. त्याचे वाहिन्यांवरून थेट प्रक्षेपणाचे लाडही व्हायचे. दहिहंडीच्या प्रकारावरून जेवढी कोर्टबाजी झाली तेवढी कोणत्याही विषयावरून झाली नसावी. आता मात्र शिवसेना आणि मविआ सरकारच्या विरोधात भाजप आणि मनसेला मोठे हत्यार मिळाले आहे. पूर्वी शिवसेना हेच काँग्रेसच्या विरोधात करत असे. आपल्याकडे सण हेच जास्त करून राजकीय पक्षांच्या सोयीच्या राजकारणासाठीच आहेत. हिंदू सणांसाठी पूर्वी शिवसेना लढत असे. आज भाजप आणि मनसे लढत आहे. केवळ भूमिका बदलल्या आहेत. मनसे आणि भाजपने यंदा दहिहंडी आयोजित करण्यासाठी घेतलेली आक्रमक भूमिका ही केवळ मुंबई पालिका निडवणुका डोळ्यासमोर ठेवूनन आहे, हे तर निश्चित आहे. भाजप राज्यात सत्तेत असता आणि शिवसेना युतीत असती किंवा नसती तरीही जर भाजपने दहिहंडी आयोजित करण्याची परवानगी दिली नसती तर शिवसेनेने अशीच आरडाओरड केली असती. शेवटी हा धार्मिक ध्रुविकरणाच्या जोरावर मते मिळवण्याचा प्रयत्न आहे. जन्माष्टमी साजरी करण्याचा हा विषयच नाहि. हा विषय आहे मुंबई पालिका निवडणुकीत धर्माच्या जोरावर मते गठित करण्याचा आणि यात सारे पक्ष सारखेच सहभागी आहेत. हा विषय जास्तीत जास्त पेटेल तितका मनसे आणि भाजपला याचा लाभ होणार आहे. शिवसेनाही धुतल्या तांदळासारखी नाहि. तिनेही यापूर्वी असेच धार्मिक ध्रुविकरणाचे प्रयोग केले आहेत. दहिहंडीवरून राजकारण नवे नाहि. पण यंदा तीव्रता वाढली आहे आणि शिवसेना यात खलनायक म्हणून रंगवली जात आहे. पूर्वी असेच काँग्रेस आणि न्यायालयांना रंगवले जायचे. बाकी खेळ तोच आहे. फक्त खेळाडू बदलले आहेत. राजधर्म, निष्काम कर्मयोग, मूर्तिमंत उत्साह यांचे प्रतिक असलेल्या भगवान श्रीकृष्णांच्या जन्माचा सण असा राजकारणात वाया जाऊ नये. पण हे वर्षानुवर्षे होत आले आहे. मात्र लोकानीही कोरोनाच्या तिसर्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सावधानतेनेच जन्माष्टमी साजरी करावी. केरळमध्ये ओणमनंतर कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढली. तसे महाराष्ट्रात जन्माष्टमीनंतर होऊ नये. यात धार्मिक भावना दुखवण्याचा प्रश्न येत नाहि.