आठवड्यात फक्त चार दिवस काम, Swiggy ने कर्मचाऱ्यांना दिली ‘गुड न्यूज’

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

आठवड्यात फक्त चार दिवस काम, Swiggy ने कर्मचाऱ्यांना दिली ‘गुड न्यूज’

देशभरात करोनाचा कहर सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर आघाडीची ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणारी कंपनी स्विगीने (Swiggy) आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. यानुसार स्विगीचे कर्मचारी मे महिन्यामध्ये आठवड्यात फक्त चार दिवस काम करतील. करोनाचं वाढतं थैमान बघता कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा महत्त्वाचा निर्णय घेतला.

कोणते चार दिवस काम करायचं हे देखील कर्मचारी ठरवणार
स्विगीचे मानव संसाधन प्रमुख(एचआर हेड) गिरीश मेनन यांनी 1 मे रोजी आपल्या कर्मचाऱ्यांना एक ई-मेल पाठवून याबाबत माहिती दिली आहे. स्विगीच्या कर्मचाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली असून आम्ही त्यांचा सन्मान ठेवतो. देशभरात करोनाग्रस्तांची वाढती संख्या बघून आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांसाठी मे महिन्यात आठवड्यामध्ये फक्त चार दिवस काम करण्याची मूभा देण्याचा निर्णय घेतला आहे. असं या मेलमध्ये नमूद करण्यात आलं आहे. आठवड्यात कोणते चार दिवस काम करायचं याचा निर्णयही कर्मचाऱ्यांवर असेल, असंही स्विगीकडून सांगण्यात आलं आहे.

कर्मचाऱ्यांसाठी मेडिकल सुविधा
आठवड्यातून चार दिवस काम करा आणि स्वतःसोबत कुटुंबियांची व मित्रांचीही काळजी घ्या असं मेनन यांनी आपल्या मेलमध्ये म्हटलं आहे. यासोबतच आपण कोविड टास्क फोर्सची स्थापना केली आहे. जर सुट्टीच्या दिवशी कोविड टास्क फोर्समध्ये काम करण्याची इच्छा असेल तरी तुमचं स्वागत आहे. आपण अन्य लोकांना यात सहभागी करुन चांगलं कार्य करु शकतो, असंही या मेलमध्ये नमूद करण्यात आलं आहे. स्विगीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाइन मेडिकल कन्सल्टेशन आणि मेडिकल सपोर्टची सुविधाही सुरू केली आहे. यात स्विगीच्या कर्मचाऱ्यांना होम आयसोलेशन किंवा क्वॉरंटाइन केअर कव्हरेज यांसारखी सुविधा मिळते.