मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना करोनाची लागण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना करोनाची लागण

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात हाहाकार केला होता. दरम्यान, सध्या परिस्थिती काहीशी हातात आहे. मुंबईत करोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला होता. मुंबईतील परिस्थीती नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सक्रीय होती. दरम्यान या यंत्रणेकडून उपाययोजना राबवून घेणारे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना करोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येते.

करोना आल्यापासून काकाणी यांनी करोना निर्मुलनासाठी काम केले. गुरुवारी त्यांना बरे वाटत नसल्यामुळे त्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. करोना आल्यापासून काकाणी यांनी स्वताला करोना लढ्यात सामील केले आहे. कोणताही गाजावाजा न करता त्यांनी आपली कामगिरी चोखपणे बजावली. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देखील त्यांनी उपाययोजना राबवल्या आहेत.

करोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांनी दिल्याने त्यादृष्टीने मुंबई महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे. करोना चाचण्यांची आणि प्रत्येक बाधितांच्या संपर्कातील २० व्यक्तींचा शोध घेण्याचे आदेश पालिकेने सात परिमंडळ आणि २४ विभागांना दिले आहेत. निर्बंध शिथिल केल्यानंतर रुग्णसंख्या वाढण्याचा धोका लक्षात घेऊन पालिकेने खाटांची संख्या वाढविण्याची तयारी सुरू केली आहे. यासंबंधीची बैठक पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी घेतली होती.