मुंबईची प्रतिमा जपण्यासाठी सतर्कता आवश्यक!
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : साकीनाका बलात्कार घटनेतील आरोपीच्या विरोधात महिनाभरात आरोपपत्र न्यायालयात दाखल करावे आणि एक सुरक्षित शहर म्हणून मुंबईची असलेली प्रतिमा डागळणार नाही याची खबरदारी घ्यावी, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साकीनाका घटनेच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना शनिवारी दिला.
ही अतिशय दुर्दैवी घटना असून एका महिन्याच्या आत आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करावे, जलदगती न्याय काय असतो ते अशा नरराक्षसांना दाखवून द्यावे, जेणेकरून पुढे कुणी अशी हिंमत करणार नाही. उद्यापासून तातडीने या प्रकरणी विशेष सरकारी अभियोक्तांची नेमणूक करून न्यायालयीन खटल्याची तयारी करावी, असे स्पष्ट निर्देशही ठाकरे यांनी दिले. साकीनाका दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी तातडीने वरिष्ठ पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि मिलिंद भारंबे उपस्थित होते.
साकीनाका येथील घटनेबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या दहा मिनिटांत त्याठिकाणी पोहचून जखमी महिलेस राजावाडी रुग्णालयात दाखल केले आणि कुठेही वेळ दवडला नाही, तसेच तातडीने संशयितास पकडले याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले.
या घटनेतील सर्व न्यायवैद्यकीय, इलेक्ट्रॉनिक पुरावे तसेच साक्षीदारांचे पुरावे व्यवस्थित जमा करून हे प्रकरण न्यायालयात मजबुतीने मांडावे, तसेच कुठेही कमतरता राहणार नाही हे पाहण्याचे निर्देश दिले. एक महिन्याच्या आत दोषारोपपत्र दाखल झाले पाहिजे, तसेच न्यायालयात खटला उभा राहील त्याची वाट न पाहता उद्यापासूनच विशेष सरकारी अभियोक्ता नियुक्त करून काम सुरू करावे, असेही निर्देश दिले.
हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीस कठोरात कठोर शिक्षा होईल असे पाहून पीडित दुर्दैवी महिलेस न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.