दिल्लीत आजपासून बालकांवर लसचाचण्या
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : कोव्हॅक्सिन या स्वदेशी लशीच्या ६ ते १२ वयोगटातील मुलांवरील चाचण्या येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत मंगळवारपासून सुरू होत आहेत. त्यासाठी स्वयंसेवक पात्र मुलांची निवड आधीच करण्यात आली होती.
करोनाची तिसरी लाट आली तर लहान मुलांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने या चाचण्यांना विशेष महत्त्व आहे. त्यानंतर २ ते ६ वर्षे वयातील मुलांच्या चाचण्याही घेण्यात येणार आहेत पण त्यासाठी काही कालावधी लागेल, कारण मुलांच्या निवडीपासून प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.
१२ ते १८ वयोगटातील मुलांच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर ६ ते १२ वयोगटासाठी या चाचण्या मंगळवारपासून सुरू होत आहेत. अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्राच्या सामुदायिक वैद्यक शाखेचे प्राध्यापक डॉ. संजय राय यांनी सांगितले की, ६ ते १२ वयोगटातील मुलांच्या चाचण्या मंगळवारपासून सुरू होत असून त्यात कोव्हॅक्सिन ही लस त्यांना दिली जाणार आहे. नंतर त्याचे परिणाम तपासले जातील. भारतीय औषध महानियंत्रकांनी दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना परवानगी दिली असून भारत बायोटेक कंपनीची ही लस आहे. १२ मे रोजी २ ते १८ वयोगटातील मुलांच्या चाचण्या घेण्यासाठी परवानगी देण्यात आली.