सत्याचा विजय झाला, राणेंच्या बाबतीत राजकीय खेळ सूडबुद्धीने : चंद्रकांत पाटील

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सत्याचा विजय झाला, राणेंच्या बाबतीत राजकीय खेळ सूडबुद्धीने : चंद्रकांत पाटील

पुणे : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संदर्भात घडलेला घटनाक्रम आणि राजकीय नाट्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर तीव्र आणि उपहासात्मक टीका केली.
ट्वीटर द्वारे आपली भूमिका मांडताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ''महाराष्ट्रात मंगळवारी दिवसभर सुरू असलेला राजकीय खेळ सूडबुद्धीने झालेला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. न्यायालयात राज्य सरकारने मांडलेला कोणताही मुद्दा टिकला नाही. या कारणाने मा. नारायणराव राणे जी यांना न्यायालयाने पूर्णपणे जामीन दिला. यातून हेच दिसून येते की, सत्याचा विजय झाला. गेल्या २० महिन्यात एखाद्या कार्यकर्त्याला किंवा नेत्याला अडकवणारी राज्य सरकारची एकही गोष्ट न्यायालयात टिकली नाही.न्यायालयाकडूनच प्रत्येक वेळी सरकारला चपराक बसली आहे. अनपेक्षितपणे मिळालेल्या सत्तेचा दुरुपयोग केल्यामुळे सरकारविरुद्ध न्यायालयाने दर वेळेस योग्य तोच निकाल दिला आहे.
भाजपा कधीही मनामध्ये राग ठेऊन कोणतेही काम करत नाही. मा. राणे जी यांच्यासोबत जो अमानवीय प्रकार घडला, त्यामुळे त्यांची तब्येतसुद्धा बिघडली. त्यांना अटक केल्यानंतर कोणतेही वैद्यकीय उपचार वेळेवर दिले गेले नाहीत. त्यांची तब्येत ठीक झाल्यानंतर जन आशिर्वाद यात्रा पुन्हा सुरू होईल. राज्य सरकार फार घाबरट आहे. रात्री १२ वाजल्यापासून सिंधुदुर्गात त्यांनी संचारबंदी लावली. संपूर्ण महाराष्ट्र पेटला असताना केवळ सिंधुदुर्गात संचारबंदी का?राणे जी यांच्या यात्रेला मुंबईत उदंड प्रतिसाद मिळाला.पोपटाचा प्राणही मुंबई महानगरपालिकेत आहे.ती हरली तर काय राहणार यांच्याकडे ...कायदा व सुव्यवस्थेवर होणारा परिणाम ही आमची जबाबदारी नाही. टाळी एका हाताने वाजत नाही. ज्यावेळी शेकडो लोकं राणे जी यांच्या घरासमोर जमा होतात, तेव्हा कायदा व सुव्यवस्था कुठे असते ? राणे जी यांचे घर फोडायला गेलेल्या लोकांचे मुख्यमंत्री अभिनंदन करतात, हेच दुर्दैव आहे. "