सचिन वाझेंना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सचिन वाझेंना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकं ठेवल्याचं प्रकरण आणि मनसूख हिरेन हत्येप्रकरणी एनआयएनं सचिन वाझे यांना अटक केली आहे.त्यानंतर वाझेंना पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं.आता सचिन वाझे न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र या कारवाईदरम्यान सचिन वाझेंना हृदयविकाराचा त्रास असल्याचं समोर आलं होतं.यासाठी सचिन वाझेंकडून गेल्या आठवड्यात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.यावर न्यायालयाने सचिन वाझेंना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली होती.भिवंडी येथील एका रुग्णालयात वाझे उपचार घेत होते. परंतु त्या रुग्णालयात पुढचे उपचार होऊ शकणार नाहीत. त्यामुळे मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल होण्याची परवानगी मिळावी यासाठी वाझे यांनी नव्याने न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

दरम्यान,  सचिन वाझे यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. वैद्यकीय उपचारासाठी मुंबईतील खासगी वोकहार्ट रुग्णालयात दाखल होण्याची परवानगी सचिन वाझे यांना न्यायालयाने दिली आहे.वाझे यांच्यासोबत त्यांच्या पत्नीला देखील राहण्याची मुभा देण्यात आली आहे.विशेष न्यायालयात यावर सुनावणी झाली.सराकरच्या वकीलांनी या अर्जाला विरोध केला नाही.

राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडून या प्रकरणात तपास सुरु आहे.२५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पियो कार आढळून आली होती.तर या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह यानंतर काही दिवसांनी म्हणजेच ५ मार्च रोजी कळव्यातल्या खाडीमध्ये सापडला होता.आधी या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथक करत होतं.मात्र, त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार, हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला.या दोन्ही प्रकरणातल्या आरोपांवरुन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली होती.त्यानंतर त्यांना निलंबितही करण्यात आलं होतं.वाझे यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयातही धाव घेतली होती.मात्र, त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता.