राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर आज मुंबईत एकमेकांची भेट घेतली. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या या भेटीत दोघांच्या लंचचे देखील नियोजन आहे. या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकींनी त्यांनी ममता बॅनर्जींना विजय मिळवून दिला. त्यानंतर त्यांनी निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट (व्यूहरचनाकार) कामगिरीतून ब्रेक घेत असल्याची घोषणा केली होती. आता ते नेमकी काय चर्चा करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

यूपीएच्या नेतृत्वावर होऊ शकते चर्चा
2024 मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्ष एकत्रित येऊन भाजप विरोधात लढा उभारणार अशी शक्यता आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला आव्हान देणाऱ्या या विरोधी आघीडाचे अर्थातच यूपीएचे नेतृत्व कोण करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात आज चर्चा होऊ शकते.

संजय राउत यांच्या विधानाने चर्चा
शिवसेना खासदार संजय राउत यांच्या नुकत्याच केलेल्या एका विधानाने या भेटीवर राजकीय अंदाज लावले जात आहेत. संजय राउत म्हणाले होते, की शरद पवार देशाचे टॉप लीडर आहेत. अशात यूपीएचे नेतृत्व सुद्धा शरद पवार यांना दिले जाईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सद्यस्थितीला प्रादेशिक पक्षांना एकत्रित आणण्यासाठी एका मुरब्बी राजकारण्याची गरज आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांनी एकत्रित येऊन सत्ता स्थापित करण्यामागे शरद पवार यांची मोठी भूमिका आहे.