मुंबई लोकल ट्रेन सर्वांसाठी कधी सुरू होणार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबई लोकल ट्रेन सर्वांसाठी कधी सुरू होणार

मुंबई। कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर देशभरात दैनंदिन व्यवहार पुन्हा सुरळीत झाले आहेत. राज्यातही परिस्थिती वेगळी नाही. मात्र, मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल ट्रेन अद्याप सर्वांसाठी सुरू झालेली नाही. काही अटींसह सध्या लोकल ट्रेन सुरू आहे. मात्र, त्यामुळं अद्यापही लाखो मुंबईकरांची फरपट सुरू आहे. ही फरपट कधी थांबणार आणि लोकल ट्रेन सर्वांसाठी कधी सुरू होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज त्यावर केंद्राची भूमिका मांडली.मुंबई लोकल ट्रेन सर्वांसाठी सुरू करण्यास केंद्र सरकारला कुठलीही अडचण नाही. कोविडची साथ नियंत्रणात असल्याचं सांगून राज्य सरकारनं लोकल सुरू करण्याची पत्राद्वारे विनंती केल्यास आम्ही तात्काळ परवानगी देऊ,' असं दानवे यांनी आज स्पष्ट केलं.

केंद्राची भूमिका स्पष्ट केल्यानंतर तरी राज्य सरकार पावलं उचलणार का

कोविड लसीचे दोन डोस घेतलेल्यांना सध्या लोकल ट्रेननं प्रवास करण्याची परवानगी आहे. त्यासाठी रेल्वेनं विशेष मासिक पासची सोय देखील केली आहे. मात्र, पुरेशा पुरवठ्याअभावी संथ गतीनं सुरू असलेल्या लसीकरणामुळं अद्याप लाखो मुंबईकर दुसऱ्या डोसपासून वंचित आहेत. परिणामी गरज असूनही त्यांना रेल्वेनं प्रवास करणं कठीण झालं आहे. त्याचा थेट परिणाम नोकरीधंद्यावर होतो आहे. मुंबई लोकल ट्रेन पुरेशा क्षमतेनं धावत नसल्यानं अजूनही अनेक छोटे-मोठे व्यवसाय बंद आहेत. अनेक कार्यालये बंद आहेत. त्यामुळं त्या कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कामगारांचे हाल होत आहेत. त्यामुळं राज्य सरकारनं निर्बंध आणखी शिथील करून लोकल प्रवासाला परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे. आता रावसाहेब दानवे यांनी केंद्राची भूमिका स्पष्ट केल्यानंतर तरी राज्य सरकार पावलं उचलणार का, याविषयी उत्सुकता आहे.