“मी प्रबोधनकारही वाचलेत आणि मी…”, शरद पवारांच्या खोचक सल्ल्याला राज ठाकरेंचं प्रत्युत्तर!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

“मी प्रबोधनकारही वाचलेत आणि मी…”, शरद पवारांच्या खोचक सल्ल्याला राज ठाकरेंचं प्रत्युत्तर!

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीपातींचं राजकारण, त्यांच्यातला परस्पर द्वेष वाढला असा आरोप राज ठाकरेंनी केल्यानंतर त्यावर शरद पवारांनी राज ठाकरेंना खोचक सल्ला दिला होता. “राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंचे विचार वाचावेत”, असा सल्ला शरद पवार यांनी विचारला होता. त्या मुद्द्यावरून आता राज ठाकरेंनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.तसेच, यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या घेतलेल्या एका मुलाखतीचा संदर्भ देखील देत पवारांच्या राजकारणावर टीका केली. त्यामुळे आता जातीपातीच्या राजकारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांच्यात वाकयुद्ध रंगण्याची शक्यता आहे.

“माझ्या आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध?”

प्रबोधनकार ठाकरेंचे विचार वाचण्याचा सल्ला देणाऱ्या शरद पवार यांना प्रत्युत्तर देताना राज ठाकरेंनी आपल्या आधीच्याच भूमिकेचा पुनरुच्चार केला. “मी प्रबोधनकार ठाकरेही वाचलेत आणि मी यशवंतराव चव्हाणही वाचलेत. मी जे बोललो त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध होता हे मला पवार साहेबांनी समजावून सांगावं. एका चॅनलला मी मुलाखत दिली. गेल्या ७५ वर्षांमध्ये आपण काय कमावलं आणि गमावलं याचा उहापोह त्यात होता. मी त्यांना हेच सांगितलं की आपण वैचारिकदृष्ट्या जोपर्यंत प्रगत होत नाही, तोपर्यंत आपल्याकडे कितीही चांगल्या गोष्टी आल्या, तरी आपली प्रगती होणार नाही. आपण वैचारिकदृष्ट्या प्रगत झालो का? या अनुषंगाने माझी भूमिका होती”, असं राज ठाकरे म्हणाले.

“प्रबोधनकारांचं हवं तेवढंच घ्यायचं आणि…”

“जात ही गोष्ट हजारो वर्षांपासून आपल्याकडे आहे. १९९९ साल जर आपण पाहिलं, तर त्याआधीपर्यंत राज्यात जातीपाती होत्याच. पण ९९ सालानंतर जातीपातींमध्ये एकमेकांबद्दल द्वेष वाढला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष जास्त वाढला. हे सगळ्यांना माहिती आहे. सर्व राजकीय पक्षांना माहिती आहे. बोललो फक्त मी. या सगळ्या संदर्भात राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरे पुन्हा वाचावेत, याचा अर्थच कळला नाही. माझ्या आजोबांचे अनेक संदर्भ त्या त्या काळातले होते. आपल्याला पाहिजे तेवढंच प्रबोधनकार ठाकरेंचं घ्यायचं, बाकीचं घ्यायचं नाही असं करता येणार नाही. यशवंतराव चव्हाण यांचे विचार देखील मी वाचले आहेत”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.