बाबुल सुप्रियोंचा तृणमूलमध्ये प्रवेश!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

बाबुल सुप्रियोंचा तृणमूलमध्ये प्रवेश!

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे माजी खासदार बाबुल सुप्रियो यांनी शनिवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यानंतर सुप्रियो यांनी अलीकडेच भाजपा सोडल्याचे जाहीर केले होते. त्यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणाही केली होती. त्यानंतर आता तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी तृणमूलचे सदस्यत्व दिले आहे. यावेळी खासदार डेरेक ओब्रायन देखील उपस्थित होते.

सुप्रियो यांनी फेसबुकवरुन राजकारण सोडण्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, बाबुल सुप्रियो यांनी आपण भाजपाच्या बड्या नेत्यांना भेटलो होतो, पण त्यांनी त्यांच्या पुढील निर्यणाबाबत अद्याप काहीही सांगितले नाही असे म्हटले होते. मी भविष्यात काय करणार हे फक्त वेळच सांगेल असेही सुप्रियो यांनी त्यावेळी म्हटले होते. “भाजपाचे अनेक नेते तृणमूलच्या नेतृत्वाच्या संपर्कात आहेत. ते भाजपावर समाधानी नाहीत. एक (बाबुल सुप्रियो) आज सामील झाले आहेत, दुसरे उद्या सामील होऊ इच्छित आहे. ही प्रक्रिया सुरू राहील. थांबा आणि बघत रहा,” अशी प्रतिक्रिया बाबुल कुणाल घोष यांनी यावेळी दिली.

“जेव्हा मी राजकारण सोडणार असे सांगितले तेव्हा त्याचा अर्थ माझ्या मनाला पटला. मला वाटले की मला एक मोठी संधी सोपवण्यात आली आहे (तृणमूलमध्ये सामील झाल्यावर). माझे सर्व मित्र म्हणाले की राजकारण सोडण्याचा माझा निर्णय चुकीचा आणि भावनिक होता,” असे सुप्रियो यांनी म्हटले आहे.

 

“मला माझा अभिमान आहे की मी माझा निर्णय बदलत आहे. बंगालची सेवा करण्याच्या उत्तम संधीसाठी मी परत येत आहे. मी खूप उत्सुक आहे. मी सोमवारी दीदी (मुख्यमंत्री ममता बॅनर्जी) यांना भेटेन. या स्वागतामुळे भारावून गेलो आहे. दीदी आणि अभिषेकने मला एक उत्तम संधी दिली आहे. मी आसनसोलमुळे राजकारणात प्रवेश केला आहे. मी त्या मतदारसंघासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असेही बाबुल सुप्रियो यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्रीमंडळातील फेरबदलानंतर बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेतला असल्याचे म्हटले होते. “गुडबाय…. मी कोणत्याही राजकीय पक्षात जात नाहीये, टीएमसी, काँग्रेस, सीपीआय(एम) कोणीही मला बोलावलेलं नाही, मी कुठेही जाणार नाही. समजाकार्य करण्यासाठी राजकारणातच असण्याची गरज नाही,” असं त्यावेळी सुप्रियो यांनी म्हटलं होतं.