८६.६४ टक्के मुंबईकर नागरिकांमध्ये आढळली कोविड - १९ प्रतिपिंड

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

८६.६४ टक्के मुंबईकर नागरिकांमध्ये आढळली कोविड - १९ प्रतिपिंड

मुंबई : कोविड-१९ विषाणू संसर्गजन्य साथरोगाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे महानगरपालिका क्षेत्रात पाचवे सेरो सर्वेक्षण अर्थात रक्त नमुन्यांची चाचणी करुन प्रतिपिंड (अॅण्टीबॉडीज्) शोधण्याबाबतचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणानुसार, एकूण ८६.६४ टक्के नागरिकांमध्ये प्रतिपिंडांचे अस्तित्व दिसून आले आहे. कोविड लसीकरण झालेल्या नागरिकांपैकी प्रतिपिंड विकसित झालेल्यांची संख्या ९०.२६ टक्के तर लसीकरण न झालेल्यांपैकी ७९.८६ टक्के नागरिकांमध्ये प्रतिपिंड आढळली आहेत. विशेष म्हणजे, मागील सर्वेक्षणांच्या तुलनेत झोपडपट्टी तसेच बिगर झोपडपट्टी परिसरांमध्ये देखील प्रतिपिंड विकसित होण्याचे प्रमाण वाढल्याचा निष्कर्षही यातून समोर आला आहे.

दरम्यान, प्रतिपिंड आढळले तरी ते किती प्रमाणात सुरक्षितता प्रदान करतील, याची वैद्यकीय हमी देता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी ढिलाई न करता, कोविड विषाणू संसर्ग होवू नये म्हणून मास्कचा योग्य उपयोग, हातांची नियमित स्वच्छता, सुरक्षित अंतर इत्यादी कोविड अनुरुप वर्तणूकीचे पालन करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करण्यात येत आहे.

कोविड-१९ विषाणू संसर्गजन्य साथरोगाच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे विविधस्तरीय प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी सातत्याने करण्यात येत आहे. या उपाययोजनांची अंमलबजावणी करताना कोविडच्या प्रसाराबाबत निश्चित अशी शास्त्रीय माहिती उपलब्ध करून घेणे गरजेचे असते. याचाच एक भाग असलेल्या सेरो सर्वेक्षणामध्ये रक्त नमुने घेऊन त्यातून प्रतिपिंड (अॅण्टीबॉडीज्) अस्तित्वात आहेत किंवा कसे, याचा अभ्यास केला जातो. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांमध्ये आतापर्यंत तीनवेळा सेरो चाचणी करण्यात आली आहे. तर एकदा लहान मुलांचे विशेष सेरो सर्वेक्षण करण्यात आले आहे.

या चार सर्वेक्षणानंतर, कोविडच्या संभाव्य तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर, पुन्हा एकदा रक्त नमुने विषयक सर्वेक्षण करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी यांनी दिले होते. त्यानुसार, दिनांक १२ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२१ या कालावधीमध्ये महानगरपालिकेने पाचवे सेरो सर्वेक्षण राबवले. त्यातील निष्कर्ष आता जाहीर करण्यात आले आहेत.

महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग, शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय यांच्या वतीने आणि एटीई चंद्रा फाऊंडेशन व आयडीएफसी इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त सहकार्याने हे पाचवे सेरो सर्वेक्षण राबविण्यात आले. शास्त्रोक्तरित्या यादृच्छिक नमुना निवड पद्धतीचा (random sampling) वापर करून, वय वर्ष १८ पेक्षा अधिक असलेल्या नागरिकांमध्ये हे सेरो सर्वेक्षण केले आहे. महानगरपालिकेचे दवाखाने तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडे येणाऱया विविध समाज घटकातील रुग्णांचा यामध्ये समावेश होता. अशा रितीने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व २४ प्रशासकीय विभागात मिळून एकूण ८ हजार ६७४ नागरिकांचे रक्त नमुने संकलित करुन त्याची चाचणी करण्यात आली. सर्वेक्षण केलेल्या नागरिकांची माहिती नोंदविण्यासाठी मोबाईल अॅप्लीकेशनचा उपयोग करण्यात आला तसेच सर्वेक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांची संमती देखील घेण्यात आली.