दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपींवर दोषारोपपत्र निश्चित, लवकरच खटला सुरु होणार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपींवर दोषारोपपत्र निश्चित, लवकरच खटला सुरु होणार

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपी डॉ विरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ऍड संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावरील दोषारोपपत्र निश्चित करण्यात आले आहे. मात्र आरोपींनी गुन्हा कबूल नसल्याचे न्यायालयाला सांगितले. यावर आता ३० सप्टेंबरला सरकार व बचाव पक्षातर्फे पुराव्यासंबंधीची कागदपत्रे सादर केली जाणार आहेत. त्यामुळे खटला सुरू होण्यास डॉ दाभोलकर यांच्या हत्येनंतर आठ वर्षानंतर गती मिळणार आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयापुढे बुधवारी ही सुनावणी झाली. करोना साथरोगाचे कारण सांगून आरोपींनी वकील व नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी आरोप निश्चितीस पुन्हा मुदत देण्याची विनंती न्यायालयाला केली. त्यावर न्यायालयाने मुदतवाढ देण्यास नकार देत आरोप निश्चिती झाली असून, गुन्हा कबूल आहे की नाही, अशी विचारणा आरोपींना केली. त्यावर आरोपींनी गुन्हा कबूल नसल्याचे न्यायालयाला सांगितले.

या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे, विरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी हजर होते, तर आरोपी संजीव पुनाळेकर व विक्रम भावे प्रत्यक्ष उपस्थित होते. सीबीआयतर्फे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी आणि बचाव पक्षातर्फे वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी कामकाज पाहिले.