छोट्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका घेण्याचे सरकारचे आदेश

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

छोट्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका घेण्याचे सरकारचे आदेश

मुंबई : निवडणूक नियमावली आणि करोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या २५० व त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या (हौसिंग सोसायट्या) निवडणुकांवरील निर्बंध सरकारने अखेर गुरुवारी उठविले.त्यानुसार या निवडणुकीस पात्र असलेल्या सर्व गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका त्वरित सुरू करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत.

राज्यात २५० पेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या ७० ते ७५ हजार गृहनिर्माण संस्था आहेत. या निवडणुका सोसायटीनेच घ्यायच्या आहेत.२५० व त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका घेण्याचे अधिकार सहकार निवडणूक प्राधिकरणाऐवजी संबधित सोसायटीलाच देण्याचा निर्णय सरकारने तीन वर्षांपूर्वी घेतला होता. मात्र, त्यासाठीची नियमावली तयार नसल्याने निवडणुका कशा घ्यायच्या, असा प्रश्न सहकारी संस्थांसमोर निर्माण झाला होता.ऑक्टोबर २०१९ मध्ये सहकार विभागाने निवडणुकीबाबतची नियमावली तयार करून त्यावर जनतेच्या हरकती- सूचना मागवल्या. त्यावर गृहनिर्माण संस्थांनी मोठ्या प्रमाणात सूचना नोंदवल्या. त्यानुसार मूळ नियमावलीत अनेक सुधारणा करून अंतिम नियमावली फेब्रुवारी-मार्च दरम्यान मंजूर करण्यात आली.

करोनामुळे या निवडणुका तीन वेळा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. करोनाची लाट ओसरताच सहकार विभागाने काही दिवसांपूर्वीच २५० पेक्षा अधिक सभासद असलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका सुरू करण्याचे आदेश दिले होते. आता २५० पेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून त्याबाबतचा आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने निर्गमित केला आहे.