किरीट सोमय्यांवरील कारवाईनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

किरीट सोमय्यांवरील कारवाईनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला असून अनेक गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्यांच्या या आरोपांना आणि टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, पाठबळावर महाराष्ट्र राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे असा आरोप संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.

नाट्याला एक परंपरा, पावित्र्य असून त्यात एक सत्यता असते. मराठी नाटकाला प्रतिष्ठा आहे असा टोला यावेळी संजय राऊत यांनी लगावला. “कालपासून जे काही घडत आहे किंवा घडवलं जात आहे ते विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, पाठबळावर महाराष्ट्र राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रकारचे आरोप करुन लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणं हा गेल्या काही दिवसांपासून विरोक्षी पक्षाकडून उपक्रम राबवला जात आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला.

आरोप करणाऱ्यांवर काल जी काही कारवाई झाली ती गृहमंत्रालयाने केली आहे. त्यामध्ये आकस आणि सूड या शब्दांचा वापर करु नये. मी पूर्ण माहिती घेतली असून गृहमंत्रालयाला कायदा आणि सुव्यवस्थेबाबत काही प्रश्न निर्माण होईल असं वाटलं. त्यातून ही कारवाई झाली असून यासंबंधी मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची गरज नाही. मुख्यमंत्री अशा लहान गोष्टीत पडत नाहीत. कोणी असे खोटे आरोप केले तर आमच्या सरकारला भोकं पडत नाहीत,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

तुमच्याकडे पुरावे असतील तर महाराष्ट्रात पोलीस, तपास यंत्रणा आहेत. त्या सगळ्या संस्था, महाराष्ट्र पोलीस दल, राज्यातील संस्था निष्पक्षपणे तपास करत असता. पण तुम्ही केंद्र सरकारच्या आदेशावर महाराष्ट्राच्या मंत्र्यांवर, प्रमुख लोकांवर आरोप करत असाल आणि त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर गृहमंत्रालय कारवाई करु शकतं. त्याची आता राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्याची गरज नाही. मी मुख्यमंत्र्यांशी याविषयी बोललो असून याचा मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंध नसल्याचं सांगितलं आहे. गृहमंत्रालयाला जर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे असं वाटलं असेल तर त्यांनी तशी कारवाई केली असेल,” असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.