नारायण राणेंना रत्नागिरी पोलिसांकडून अटक
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाखाली लावण्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणेंना चांगलंच भोवलं आहे. नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. नारायण राणेंना अटक कऱण्यासाठी पोलीस अधीक्षक पोहोचले होते. पण त्यांच्याकडे अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अन्य कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने राणेंनी खोलीतून बाहेर येण्यास नकार दिला होता. मात्र नंतर त्यांना अटक करुन गाडीतून नेण्यात आलं.
नारायण राणे यांना त्यांच्याच गाडीत बसवून पोलीस रवाना झाले आहेत. यावेळी निलेश राणे आणि समर्थकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे तैनात होता. अखेर पोलीस नारायण राणेंना घेऊन रवाना झाले आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान रत्नागिरी सत्र न्यायालयाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गुन्हे रद्द करण्याच्या आणि अटकेपासून दिलासा देण्याच्या मागणीसाठी नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात केली होती. नोटीस न देताच अटकेच्या करवाईचा घाट घातल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र कोर्टाने योग्य ती प्रक्रिया पार पाडून याचिका करण्याचे आदेश वकिलाला देत तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. यामुळे त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला होता.
नारायण राणे सध्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी रायगडमधील महाड येथे नारायण राणेंची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना नारायण राणे यांनी हे विधान केलं. “त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती,” असं नारायण राणे म्हणाले. या पत्रकार परिषदेत विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील उपस्थित होते.