पंजाबचा पेच सुटेना
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
इनमीन पाच राज्ये ताब्यात (त्यातही झारखंड आणि महाराष्ट्रात आघाडी करून सत्ता) असलेल्या काँग्रेसच्या मागची साडेसाती संपण्याची चिन्हे नाहित. गेल्या महिन्यात काँग्रेस श्रेष्ठींनी पंजाबातील मुख्यमंत्रि कॅप्टन अमरिंदर आणि नुकतेच काँग्रेस प्रांताध्यक्ष करण्यात आलेले नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात समेट घडवून आणून सुटकेचा श्वास घेतला होता. पण त्याला काही दिवस होत नाहित तोच पुन्हा अमरिंदर विरोधी गटाने उचल खाल्ली आहे. सिद्धू यांचे सल्लागार मालविंदर सिंह माली आणि प्यारे लाल गर्ग यांनी देशविरोधी आणि खास करून अमरिंदर विरोधी वक्तव्ये दिल्याने पंजाबातील वातावरण तापले होते. त्यामुळे सिद्धू आणि अमरिंदर यांच्यात नुकतीच जी दिलजमाई झाली ती क्षणभंगूर असल्याचेही लक्षात आले होते. पंजाब काँग्रेसचे अध्यक्षपद प्राप्त झाल्यावर तरी सिद्धू आपली बंडाची तलवार म्यान करतील आणि सहा महिन्यांवर आलेली विधानसभा निवडणूक एकत्रित जोशपूर्ण रित्या लढवतील, असे वाटत होते. परंतु ते सारेच फुसका बार ठरल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. यावेळी बंड जास्तच प्रखर आहे. कारण चार कॅबिनेट मंत्रि आणि २८ आमदारांनी अमरिंदर यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी मंगळवारी सायंकाळी बैठक घेतली. त्यामुळे पंजाब काँग्रेसमध्ये आता निकराचा संघर्ष सुरू झाला आहे, असे अनुमान काढण्यास हरकत नाहि. राजस्थानात सचिन पायलट गट केव्हा बंड करेल, याची शाश्वती नाहि. छत्तीसगढमध्ये मुख्यमंत्रि भूपेश बघेल आणि सिंगदेव यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. आणि त्यात आता पंजाबात काँग्रेसमध्ये कॅप्टनविरोधात बंड जास्तच उफाळले आहे. नुकतेच सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांची बैठक घेऊन भाजपविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले होते. पण त्याअगोदर त्यांना स्वतःच्या ताब्यात असलेल्या राज्यांमध्ये काँग्रेसची स्थिती सुधारण्याची पाळी आली आहे. त्यांना अगोदर स्वतःचे घर नीट करावे लागेल. त्यात तेवीस नेत्यांनी त्यांच्याविरोधात नव्याने आक्रमक भूमिका घेतली आहे. अमरिंदर विरोधी मंत्र्यांच्या बैठकीत सिद्धू हे सामिल झाले नव्हते, यावरूनच तेच खरे सूत्रधार आहेत, हे कळायला अकलेची गरज नाहि. अमरिंदर यांच्यावर मंत्र्यांनी ते १८ कलमी कार्यक्रम पूर्ण करू शकले नाहित तसेच पाच कलमी अजेंड्यावरही काहीही काम झालेले नाहि, असा आरोप केला आहे. पंजाब प्रभारी हरिश रावत यांनी दोन्ही गटांना डेहराडूनला बोलवून घेतले आहे. परंतु खरेतर पंजाब काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे, हेच सत्य आहे. त्याचा स्विकार करण्यास कुणीही तयार नाहि, इतकेच काय ते. तृप्त राजिंदर सिंग बाजवा हे वरिष्ठ मंत्रि आहेत आणि त्यांच्या घरी झालेल्या बैठकीत अमरिंदर यांना थेट पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली. अमरिंदर गटही शांत बसलेला नाहि. त्यांच्या गटातून सांगण्यात आले की ज्या मंत्र्यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे, त्यांना मंत्रिमंडळातून काढले जाणार होते. तर सिद्धू यांनी या बैठकीचे छायाचित्र हायकमांडला पाठवून परिस्थितीचे दर्शन घडवत असल्याचे म्हटले आहे. मंत्र्यांचे म्हणणे जरी अमरिंदर यांनी जनतेला दिलेली वचने पाळली नाहित, म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात आहोत, असे असले तरीही त्यात काही तथ्य नाहि. राजकारणात आपला खरा हेतू कुणीच उघड करत नसतो. त्याला अशीच जनतेच्या मागणीची कारणे द्यावी लागत असतात. अंतस्थ गोष्ट अशी आहे की, पंजाब काँग्रेसमध्ये पारडे आता सिद्धू यांच्याकडे झुकले आहे. अमरिंदर हे ७९ वर्षांचे आहेत. सिद्धू हे तरूण आहेत. त्यामुळे काँग्रेसमधील एक गट त्यांच्याकडे गेला आहे. आणि पंजाब काँग्रेसमधील तंट्याचे खापर आता अमरिंदर यांच्या डोक्यावर फोडले जात आहे. वास्तविक, पंजाबात काँग्रेसची सत्ता आणण्यात सगळ्यात मोठा हात अमरिंदर यांचाच होता. त्यांच्यामुळेच काँग्रेसला सत्ता मिळाली. सिद्धू यांनी राहुल गांधी यांना सर्वप्रथम पप्पू हे विशेषण वापरले होते. तरीही राहुल पंजाबात प्रचाराला ही गेले नव्हते. पण अमरिंदर यांच्या पक्षनिष्ठेचे फळ त्यांना आता कदाचित पदावरून हटवून दिले जाईल. सिद्धू हे तर बाहेरून आलेले आहेत. तरीही आजकाल सर्वच पक्षांमध्ये हेच चालते. भाजपने इतर पक्षांतून अनेक नेते आणले आणि त्याना तिकिटेही दिली. त्यांचे पानिपत झाले, हा भाग वेगळा, पण वर्षानुवर्षे निष्ठेने काम करणारे तसेच पदांपासून वंचित राहिले. हेच काँग्रेसमध्येही सुरू आहे. पंजाबात निवडणुकीत काय होईल, हे कुणीच सांगू शकत नाहि. कारण तुकड्यांमध्ये विभागली गेलेली काँग्रेस निवडणुकीला जोशात सामोरे जाईल का, हा मोठा प्रश्न आहे. इतकेच नव्हे तर, अमरिंदर आणि सिद्धू गट निवडणुकीत एकदिलाने काम करतील, ही शक्यताही या ताज्या घडामोडीने निकालात निघाली आहे. पंजाब काँग्रेस अशी दुभंगावस्थेत निवडणूक लढवत असल्याने त्याचा फायदा भाजप आणि शिरोमणी अकाली दल उठवणार, हे सांगण्याची गरज नाहिच. उलट भाजप आणि अकाली दल निवडणुकीनंतर पुन्हा एकत्रही येऊ शकतात. त्यात अकाली दलाची मायावती यांच्या बसपाशी युती आहे.त्याचा फायदा दलित मते मिळण्यात अकाली दलाला होईल. पंजाबातील मतदारांवर जास्त जबाबदारी आहे. त्यांनी आता खूप पारखून मतदान करण्याची गरज आहे. पंजाबचे भवितव्य घडवणारी ही निवडणूक आहे.