जामिनानंतर राणे पिता-पुत्रांचे सूचक ट्वीट
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई: जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी अटक आणि जामीन मंजूर झाला. त्यानंतर काही वेळातच राणे यांनी माध्यमांसमोर कोणतीही प्रतिक्रिया न देता केवळ "सत्यमेव जयते" असे दोन शब्दांचे ट्वीट केले आहे. त्यापाठोपाठ त्यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनीही सूचक ट्वीट केले आहे.
महाड सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर राणे माध्यमांसमोर प्रतिक्रिया देतील, अशी अपेक्षा होती. मात्र राणे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान मंगळवारी रात्री १२.३२ च्या सुमारास त्यांनी केवळ "सत्यमेव जयते" असे दोन शब्दांचे ट्वीट केले. त्यानंतर अल्पावधीत १२.४७ च्या सुमारास आमदार नितेश राणे यांनीही अभिनेते मनोज वाजपेयी यांच्या एका चित्रपटातील संवादाचा व्हिडिओ ट्वीट करत सूचक इशारा दिला आहे. यामध्ये वाजपेयी यांनी म्हटले आहे की, "मगर आसमान मे थूंकनेवाले को शायद यह पता नही है की पलटके थूंक उन्ही के चेहरेपर गिरेगी...करारा जवाब मिलेगा...करारा जवाब मिलेगा.."