अंशूला ऐतिहासिक रौप्य
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
भारताला पहिल्या महिला जगज्जेतेपदासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. परंतु युवा कुस्तीपटू अंशू मलिकने जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेमधील ५७ किलो वजनी गटाचे रौप्यपदक जिंकताना इतिहास घडवला. २०१६च्या ऑलिम्पिक विजेत्या हेलेन लॉसी मॅरोलिसने गुरुवारी अंतिम सामन्यात तिला चीतपट केले.
जागतिक स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी पहिली महिला कुस्तीपटू ठरलेल्या १९ वर्षीय अंशूने आक्रमक सुरुवात करताना १-० अशी आघाडी घेतली. परंतु त्यानंतर सामन्याने नाट्यमय कलाटणी प्राप्त केली आणि मॅरोलिसने अंशूच्या खांद्याची पकड घेत तिला जमिनीवर आदळत २-१ अशी आघाडी घेतली. मग मॅरोलिसने अंशूची पाठ टेकवत चीतपट केले आणि ४-१ अशा फरकाने विजय मिळवला. मॅरोलिसची पकड इतकी घट्टी होती की, सामना संपल्यानंतर अंशूसाठी त्वरित वैद्यकीय साहाय्य घ्यावे लागले. सुवर्णपदक हुकल्यामुळे तिला अश्रू आवरणे कठीण गेले.