सुरेखा पुणेकर,गायिका देवयानी बेंद्रे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : लोककलावंत सुरेखा पुणेकर आणि गायिका देवयानी बेंद्रे यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
लोककलावंत सुरेखा पुणेकर आणि गायिका देवयानी बेंद्रे यांच्यासह मुंबई महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते बबनराव गवस,मनसेच्या महिला पदाधिकारी मनिषा खैरे, अशोकराव सवने, प्रभाकर शेट्ये, संजय त्रिपाठी, सुरेश बागवे, नितीन पाटील, ओंकार गवस यांनीदेखील राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी अजित पवार यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. तसेच जे नवीन सदस्य पक्षप्रवेश करत आहेत, त्यांच्यासोबत सुसंवाद ठेवून त्यांना पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सामावून घ्यावे अशी सूचनाही केली. चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्यावतीने हा पक्ष प्रवेश घेण्यात आला होता.
सुरेखा पुणेकर यांचे मंचावरील काम उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे.स्वर्गीय यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असल्यापासून राज्यसरकारने कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. त्यानंतरही महाराष्ट्राच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी कलेची जपणूक करण्याची ही परंपरा सुरु ठेवली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जसे सर्व जाती - धर्मातील लोक आहेत त्याप्रमाणेच विविध क्षेत्रात काम करणा-या मान्यवरांचा देखील सहभाग असला पाहिजे ही शरद पवार यांची भूमिका आहे. आज प्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांचे मी पक्षात स्वागत करतो. काही जणांना विविध संघटनांमध्ये वा इतर ठिकाणी सामावून घेतले जाईल. त्याठिकाणी त्यांनी काम करावे. तसेच पुढील काळात जिल्हा परिषद, सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.