चीनमधील मोठा भूभाग बुडाला अंधारात!
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
बीजिंग: अमेरिकेला टक्कर देण्याचे स्वप्न बघणाऱ्या चीनमध्ये विजेच्या टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. चीनमधील मोठा भूभाग अंधारात बुडाला आहे. विजेची मागणी वाढत असली तरी ही मागणी पूर्ण करण्यासाठी कोळश्याचा साठा उपलब्ध नसल्यामुळे चीनमध्ये अनेक ठिकाणी दररोज ठराविक तासांसाठी विजेचा पुरवठा खंडीत केला जात आहे. China Faces Unprecedented Power Crisis
विजेच्या टंचाईमुळे अनेक चिनी कारखान्यांच्या निर्मिती प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. आधी कोरोना संकटामुळे औद्योगिक उत्पादनात घट झाली. आता विजेअभावी चीनच्या औद्योगिक उत्पादनात घट सुरू आहे. अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर कडेने लावलेले दिवे तसेच वाहतुकीचे नियमन करणारे सिग्नल बंद आहेत. विजेच्या टंचाईमुळे पाणी शुद्धीकरण प्रकल्प आणि पाणी पुरवठा करणारी यंत्रणा बंद झाली आहे. यामुळे कोट्यवधी नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. लिफ्ट बंद झाल्यामुळे उंच इमारतींमध्ये राहणाऱ्यांचे हाल होत आहेत. विजेअभावी मोबाइलचे नेटवर्क पण कोलमडले आहे. मोबाइलला सिग्नल देणारे उंचच उंच अँटिना विजेअभावी बंद आहेत.
जगातील एकूण कोळसा उत्पादनापैकी जवळपास ५० टक्के उत्पादन चीनमध्ये होते. पण विजेच्या वाढत्या मागणीमुळे चीनमध्ये कोळश्याचा वापर वाढला आहे. प्रामुख्याने औष्णिक ऊर्जेवर अवलंबून असलेला चीन दरवर्षी ऑस्ट्रेलियातून मोठ्या प्रमाणावर दर्जेदार कोळसा आयात करतो. यामुळे देशातील उत्पादन आणि आयात कोळसा या दोन्हीच्या जोरावर चीन विजेची मागणी पूर्ण करतो. पण ऑस्ट्रेलिया सोबत झालेल्या वादानंतर चीनने कोळसा आयात बंद केली. ऑस्ट्रेलिया ऐवजी इतर देशांमधून कोळसा खरेदी करण्याचा निर्णय चीनने घेतला. पण इतर देश चीनची मागणी पूर्ण करण्यात अपयशी ठरले आणि चीनमध्ये कोळसा टंचाई निर्माण झाली. कोळश्याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्यामुळे औष्णिक ऊर्जेच्या उत्पादनात घट झाली. यामुळे चीनमध्ये विजेचे संकट निर्माण झाले.
उपलब्ध आकडेवारीनुसार चीनमध्ये ऑगस्ट २०२० च्या तुलनेत ऑगस्ट २०२१ मध्ये विजेच्या उत्पादनात १४ टक्क्यांची वाढ झाली. कोळश्याच्या उत्पादनातही ४.४ टक्क्यांची वाढ झाली. जून नंतर चीनच्या कोळश्याच्या आयातीत २० टक्क्यांची वाढ झाली. पण उपलब्ध कोळसा चीनच्या विजेच्या मागणीची पूर्तता करू शकला नाही. लवकरच थंडी सुरू होईल आणि विजेच्या मागणीत आणखी वाढ होईल. यामुळे निर्माण झालेल्या ऊर्जा संकटावर तोडगा कसा काढावा असा प्रश्न चीनसमोर आहे.