राहुल गांधींवर लवकरच सोपवली जाणार मोठी जबाबदारी?

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राहुल गांधींवर लवकरच सोपवली जाणार मोठी जबाबदारी?

काँग्रेस नेतृत्वासंदर्भात पक्षांतर्गत मतभेद असतानाच पक्षामध्ये काही मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच बदलांचा एक भाग म्हणून लोकसभेमधील आपला नेता बदलण्याचा विचार काँग्रेसकडून केला जात आहे. प्रसार माध्यमांमधील वृत्तांनुसार वाय्यनाडचे खासदार राहुल गांधी यांचं नाव लोकसभेमधील काँग्रेसचे नेते म्हणून सध्या आघाडीवर आहे. सध्या या संदर्भात अधिकृतपणे कोणतीही माहिती देता येणार नाही असं काँग्रेसचे नेते सांगत आहेत. राहुल गांधी यांनाच हा यासंदर्भातील निर्णय घ्यावा लागेल असं अनेक काँग्रेस नेते खासगीत सांगत असल्याने यावर ते उघडपणे प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. लोकसभेमध्ये काँग्रेसचा नेता बदलण्यासंदर्भात विचार विनिमय सुरु आहे. काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी या राहुल गांधींनी लोकसभेतील नेतेपदाचा स्वीकार करावा यासाठी प्रयत्न करत आहेत. राहुल यांची समजूत घालून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यासंदर्भात त्यांचं मन वळवण्याचे प्रयत्न मायलेकी करत असल्याचं समजतं. पक्षातील दोन वरिष्ठ नेत्यांच्या हवाल्याने हे वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे. मात्र त्याच वेळी राहुल गांधी यांना लोकसभेतील नेतेपद दिल्यानंतर आणि त्यांची परवानगी असेल तर काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्र ही गांधी कुटुंबाव्यतिरिक्त इतर नेत्याकडे दिली जाण्याची शक्यता या नेत्यांनी व्यक्त केली आहे. असं केल्यास काँग्रेसमधील २३ वरिष्ठ नेत्यांनी लोकशाही पद्धतीने पक्षाचा अध्यक्ष निवडण्याची मागणीही पूर्ण होईल असं म्हटलं जात आहे. या २३ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून काँग्रेसमध्ये बदल करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं होतं. काँग्रेस अध्यक्षाची निवड करण्यासाठी निवडणूक घ्यायची की नाही याचा विचार नंतर केला जाईल. सध्याच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा कार्यकाळ २०२२ पर्यंत असल्याने सध्या लोकसभेतील नेतेपदाची जबाबदारी राहुल यांच्या खांद्यावर देण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र त्याचवेळी राहुल गांधींना लोकसभेमधील काँग्रेसचे नेतेपद देण्यात यावं असं पक्षातील सर्वांचे मत आहे असंही नाहीय. सध्या लोकसभेमध्ये काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांच्याकडे पक्षाचे नेतेपद आहे. राहुल गांधी हे लोकसभेमध्ये उपस्थित नसतात अशी टीका मागील काही काळापासून भाजपाकडून केली जात आहे. तसेच संसदीय समितीच्या बैठकांसाठीही राहुल गांधी उपस्थित नसल्याची टीका करत त्यांच्यावर निशाणा साधला जातो.