४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची परवानगी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची परवानगी

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा अखेर सुरू करण्याचा निर्णय़ राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे. त्यानुसार आता राज्यभरातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिलेली आहे.

करोना नियमांचे पालन करून शाळा सुरू केल्या जात आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. तर, शाळा सुरू कधी होणार? याबाबतची प्रतीक्षा आता संपलेली आहे. तर, ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार असल्याच्या वृत्ताला शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील एका वृत्तवाहिनीशी बोलताना दुजोरा दिलेला आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदाही ऑनलाइन पद्धतीनेच शैक्षणिक वर्ष सुरू करावे लागले. मात्र ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण काहीसे कमी होत असल्याने, सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचे दिसत आहे. तर, शाळा कुठल्या वर्गांची व कशा पद्धतीने, कोणत्या वेळेत सुरू होतील.. याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) घेतलेल्या सर्वेक्षणात 81.18 टक्के पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार असल्याचा निष्कर्ष दिसून आला. त्यामुळे करोनाचा प्रभाव कमी असलेल्या भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास 7 जुलैला मान्यता देण्यात आली होती.  त्यानुसार राज्यातील बहुतांश जिल्ह्य़ांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. त्यानंतर पाचवी ते सातवीचे वर्ग  17 ऑगस्टपासून सुरू करण्यास  सुरू करण्यासही शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे मान्यता दिली होती.  शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या असून, महापालिका क्षेत्रासाठी आयुक्तांच्या, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत स्तरासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याच्या, शिक्षकांचे लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.