लसीकरणाचा वेग वाढवा - पालकमंत्री

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

लसीकरणाचा वेग वाढवा - पालकमंत्री

नाशिक : काही दिवसांपासून हजारांच्या आत असलेली रुग्णसंख्या वाढत असल्याने या परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. त्याकरिता जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविण्यात यावा, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते.
पालकमंत्री म्हणाले, ग्रामीण भागात लसीकरण वाढविण्यासाठी व नागरिकांच्या सोयीच्या दृष्टिने लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्यात यावी. त्याचप्रमाणे दिवसाला एक लाख लसीकरण होण्याच्या दृष्टिने लसींची मागणी करून त्यानुसार नियोजन करण्यात यावे. तसेच ज्या ठिकाणी ऑक्सिजन निर्मीती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत, त्याठिकाणी वीजेसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटर बसविण्यात यावेत. यासोबतच जेथे ऑक्सिजन निर्मीती प्रकल्प तयार आहेत, त्या प्रकल्पांचे आमदारांनी उद्घाटन करुन प्रकल्पांचे लोकार्पण करावे, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
निफाड, येवला व सिन्नर तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस विभागाच्या मदतीने ग्रामीण भागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करावी. तसेच नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करुन रुग्णसंख्या वाढणार नाही यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे.  ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिकांची आवश्यकता आहे. त्यादृष्टिने जिल्हा परिषदेला 14 व्या वित्त आयोगाच्या व्याजातून 35 रुग्णवाहिकांना मंजूर करण्यात आल्या आहे. त्याअनुषंगाने ग्रामीण भागातील अंतर लक्षात घेता तेथे मागणीनुसार रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी नियोजन करण्यात यावे. कालबाह्य झालेल्या रुग्णवाहिका बदलून नव्या रुग्णवाहिका मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. तसेच कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या रुग्णवाहिका चालकांचे प्रलंबित वेतन तात्काळ अदा करण्यात यावे, अशा सूचनाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.