भारतात प्रगतीच्या आणि गुंतवणुकीसाठी प्रचंड संधी – पीयुष गोयल

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारतात प्रगतीच्या आणि गुंतवणुकीसाठी प्रचंड संधी – पीयुष गोयल

नवी दिल्ली:  केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री, पीयूष गोयल यांनी अनिवासी भारतीय आणि भारतीय समुदायाला भारतात निःसंकोचपणे गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. दुबईमध्ये आज इंडियन पीपल्स फोरम (आयपीएफ) उद्योग परिषदेला संबोधित करताना गोयल म्हणाले की, विशाल अशा अनिवासी भारतीय समुदायाला त्यांच्या मातृभूमीत गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे. भारतात अनन्यसाधारण प्रगतीसाठी मोठी संधी आहे. “महामारी असूनही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आपण आर्थिक निर्देशकांमध्ये वाढ पाहत आहोत.एप्रिल-सप्टेंबर 21 मध्ये मालाची निर्यात 197.11 अब्ज डॉलर्सवर पोहोचली, एप्रिल-सप्टेंबर 19 च्या तुलनेत यात 23.8% वाढ नोंदविण्यात आली. उत्पादन खरेदी व्यवस्थापक निर्देशांक सरासरी 51.5 (पहिल्या तिमाहीत) वरून 53.8 (दुसऱ्या तिमाही ) पर्यंत सुधारला आहे, तर जीएसटी संकलन सप्टेंबरमध्ये 5 महिन्यांमधील उच्चांकावर पोहोचले आहे,” असे ते म्हणाले.

भारत आणि संयुक्त अरब अमिरातीत द्वीपक्षीय संबंध प्रस्थापित झाल्याचा 50 वा वर्धापन दिन उभय देश पुढील वर्षी साजरा करणार असल्याचे सांगत, गोयल म्हणाले की आपल्या संबंधांना पुढील स्तरावर नेण्याची ही एक चांगली संधी आहे. ''आम्ही प्रगतीशील भारताच्या 75 वर्षांचे स्मरण म्हणून आणि भारताचा गौरवशाली इतिहास, संस्कृती आणि वारसा अधोरेखित करण्यासाठी 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ’साजरा करत आहोत. योगायोगाने, 1971 मधील महासंघाच्या घोषणापत्राच्या स्मृतीप्रित्यर्थ संयुक्त अरब अमिराती हे वर्ष '50 वे वर्ष' म्हणून साजरे करत आहे. संयुक्त अरब अमिरातीचे '50 चे प्रकल्प' आणि 'आत्मनिर्भर भारत' चे पंतप्रधानांचे व्हिजन आपल्या नेत्यांच्या राजकारणाला प्रतिबिंबित करते'' असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, "भारत आपली स्वातंत्र्याची शताब्दी भव्यतेने साजरी करण्यासाठी आगामी 25 वर्षांत आपल्या आकांक्षा पूर्ण करण्यावर भर देत आहे, तर संयुक्त अरब अमिरातीचे नेतृत्व पुढील 50 वर्षांच्या प्रवासाचे नियोजन करत आहे."