अभिनेता अक्षय कुमारला मातृशोक, विलेपार्ले स्मशानभूमीत झाले अंत्यसंस्कार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अभिनेता अक्षय कुमारला मातृशोक, विलेपार्ले स्मशानभूमीत झाले अंत्यसंस्कार

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन झाले. त्या ७७ वर्षांच्या होत्या. या संदर्भात अक्षयने ट्वीट करून चाहत्यांना माहिती दिली आहे. दरम्यान मुंबईतील विलेपार्ले स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अक्षयचे कुटुंबीय आणि सिनेक्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. अक्षयचा उद्या वाढदिवस असताना त्याआधी आई गेल्यामुळे तो फारच व्यथित झाला आहे.
अक्षयच्या आईची प्रकृती खालावल्याने गेल्या आठवड्यात त्यांना मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान बुधवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी शोकभावना व्यक्त केल्या.
अक्षयने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ती माझं सर्वस्व होती आणि आज मला असह्य दुःख होत आहे. माझी आई अरुणा भाटिया यांनी आज सकाळी जगाचा निरोप घेतला आणि दुसऱ्या जगात तिची वडिलांशी पुनर्भेट झाली. मी आणि माझे कुटुंब कठीण काळात असताना तुम्ही केलेल्या प्रार्थनांचा मी आदर करतो. ओम शांती.  अक्षय कुमार लंडनमध्ये सिनेमाचे शूटींग करत होता. मात्र आईची तब्येत बिघडल्याचे कळताच तो तातडीने सोमवारी सकाळी ब्रिटनहून शूटिंग सोडून मुंबईत परतला होता.
अरुणा भाटिया या चित्रपट निर्मात्या देखील होत्या. पंजाबमध्ये जन्म झालेल्या अरुणा मुलगा अक्षय कुमार बॉलिवूड अभिनेता झाल्यानंतर निर्मिती क्षेत्रात आल्या होत्या. हरी ओम प्रॉड्क्शन्सच्या त्या भागीदार होत्या. त्यांनी सिंग इज किंग, पटियाला हाऊस, ओएमजी, हॉलिडे, एअरलिफ्ट, रुस्तम, टॉयलेट - एक प्रेमकथा, मिशन मंगळ या चित्रपटांची निर्मिती केली आहे. ‘राम सेतू’ हा देखील त्यांचा आगामी प्रोजेक्ट होता. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षयचे वडील हरी ओम भाटीया हे लष्करात होते. काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले होते.