शाळेची आज पहिली घंटा!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

शाळेची आज पहिली घंटा!

मुंबई : जवळपास दीड वर्षांनंतर मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये आज सोमवारपासून पुन्हा सुरू होत आहेत. पहिल्या दिवशी मुलांच्या स्वागतासाठी शिक्षणोत्सव साजरा करण्याची सूचना शालेय शिक्षण विभागाने शाळांना के ली आहे. तसेच ‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’ या कार्यक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्व शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांच्याशी आज यूटय़ूबद्वारे संवाद साधणार आहेत.

एरवी शाळा असली की मोठय़ांप्रमाणे छोटय़ांचे आयुष्यही घडय़ाळाच्या काटय़ाप्रमाणे धावत असते. सकाळी लवकर उठून, आवरून शाळेची बस पकडणे, पहिली घंटा होण्याआधी शाळेत पोचणे, प्रार्थना वगैरे झाली की विषयानुसार भरणारे वर्ग, त्यात अभ्यासाचा ताण हलका करणारी मधली सुट्टी, खेळाचा, संगीत, चित्रकलेचा तास आणि शेवटच्या तासानंतर शाळा सुटल्याची वर्दी देणारी घंटा वाजली की तिचा आवाज कानात साठवतच घरचा रस्ता धरला जात असे. गेले दीड वर्ष मुलांचे शाळाविश्व ठप्प झाले होते. शाळा ऑनलाइन सुरू असल्या तरी या रोजच्या दिनक्रमापासून, शाळेच्या उत्साही वातावरणापासून, मित्रमैत्रिणी, शिक्षक यांच्यापासून विद्यार्थी दुरावले होते. परंतु, आता ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे तर मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या शहरी भागांतील आठवी ते बारावीचे वर्ग भरणार आहेत.

करोनाकाळात खबरदारीच्या उपाययोजना करत शाळा कशा भरवायच्या याच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. खुद्द शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी तज्ज्ञांच्या मदतीने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केले. त्यानुसार त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त यांच्या मान्यतेने राज्यातील जवळपास बहुतांश भागांतील शाळा सुरू होत आहेत.

शाळेपासून दीड वर्ष दुरावलेल्या मुलांचे स्वागत पहिल्या दिवशी उत्साहाच्या वातावरणात व्हावे, अशी सूचना विभागाने केली आहे. शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करण्यात यावे, त्यासाठी प्रसंगी मुलांच्या घरी भेट द्यावी, मुलांची शाळेतील हजेरी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शालेय कामकाजाचे तास वाढविण्याकरिता स्थानिक पातळीवर निर्णय घेता येईल. शाळांमध्ये उपस्थितीची विद्यार्थ्यांवर सक्ती करण्यात आलेली नाही. तसेच शाळा सुरू झाल्यावर लगेचच अभ्यास व परीक्षांचे ओझे मुलांवर लादू नये, अशी सूचना तज्ज्ञांच्या कृतिगटाने के ली आहे.