शिवराज्याभिषेक दिन | छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य, संघटन कौशल्य, राज्यकारभाराचा आदर्श मार्गदर्शक आणि प्रेरणादायी - उपमुख्यमंत्री
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचं राज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. 'प्रजा सुखी तरंच राजा सुखी' या न्यायानं राज्यकारभार केला. महान योद्धा, कुशल प्रशासक, लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष राजा ही स्वत:ची ओळख निर्माण केली. महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान जागृत केला. ते राजनीती, युद्धनीती, अर्थनीती, संघटनकौशल्याचा सखोल अभ्यास असलेले, मानवी मुल्यांवर निष्ठा असलेले दूरदृष्टीचे राजे होते. महाराजांचं शौर्य, त्यांचा पराक्रम, त्यांनी घालून दिलेला राज्यकारभाराचा आदर्श आद्वितीय असून त्यांचं जीवन, कार्य, विचार महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत, मार्गदर्शन करीत राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं स्मरण करुन शिवराज्याभिषेक दिनानिमित्त त्यांना त्रिवार वंदन केलं आहे. राज्यातील जनतेला शिवराज्याभिषेक दिनाच्या, शिवस्वराज्य दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत. त्यांच्यासारखा महामानव हजारो वर्षात एकदाच जन्म घेतो. अखिल मानवजातीचं कल्याण करुन जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात केलेलं कार्य अलौकिक आहे.
महाराजांनी दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांना, अठरापगड जातींना एकत्र करुन त्यांच्या मनात, स्वाभिमानाचं, स्वराज्याचं बीज रुजवलं. प्रत्येकाला आपलं वाटेल, सर्वांना न्याय मिळेल असं शिवस्वराज्य निर्माण केलं. शेतकऱ्यांना न्याय दिला. कष्टकऱ्यांना स्वाभिमान दिला. शिवराज्याभिषेकानं महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा लोककल्याणकारी राजा आपल्याला दिला. त्यांच्यासारखा राजा जगाला पाहता आला म्हणूनच शिवराज्याभिषेक दिनाचं महत्त्व आपल्या सर्वांच्या जीवनात सर्वाधिक आहे.
महाराष्ट्राचं आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शेतकऱ्यांचे कैवारी, रयतेचे राजे, युगप्रवर्तक राजे छत्रपती शिवाजी महाराजांना, शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं वंदन करत असताना त्यांच्या विचारांना आदर्श मानून, त्यांनी दाखवलेल्या वाटेवरुन चालण्याचा, महाराष्ट्राचा सन्मान वाढवण्याचा निर्धार करुया, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कृतज्ञता, आदर व्यक्त करीत राज्यातील जनतेला शिवराज्याभिषेक दिनाच्या, शिवस्वराज्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.