“पारंपरिक दहीहंडीला परवानगी द्या ; उत्सवाची परंपरा कायम राहील अशी भूमिका घ्या”
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
“काही गणेशोत्सव मंडळांनी करोना काळात ज्या पद्धतीने करोनाचे नियम पाळून उत्सवाची परंपरा कायम ठेवली, त्याच पद्धतीने दहीहंडी उत्सवाची परंपरा अखंड रहावी. म्हणून पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी.” अशी मागणी भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
तसेच, “लसीचे दोन डोस ज्यांनी घेतले आहेत, अशा गोविंदांना कमी उंचीच्या दहीहंडीला शासनाने परवानगी द्यावी. करोनाची परिस्थितीची कल्पना सर्वांना असून त्याबद्दल खबरदारी व काळजी घेण्यास जी उत्सव मंडळे तयार आहेत. त्यांना गर्दी न करता आप-आपल्याला विभागात पारंपरिक पध्दतीने कमी उंचीच्या दहीहंडीला परवानगी शासनाने द्यावी. उत्सवावर पूर्णपणे बंदी असू नये. उत्सवांची परंपरा कायम राहील अशी भूमिका शासनाने घ्यावी.” असेही आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
आज याबाबत बैठक व्हावी म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंतीही केली होती. मात्र सोलापूर दौऱ्याच्या प्रवासात असल्याने त्यांना बैठकीत सहभागी होता आलेले नाही. मुंबईसहीत महाराष्ट्रामध्ये दहीहंडी आयोजित करण्याला राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. करोनामुळे मागील वर्षी मुंबई, ठाण्यासहीत राज्यभरातील दहीहंडी पथकांनी उत्सव साजरा केला नव्हता. यंदा छोट्या प्रमाणात का असेना उत्सवाला परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. जागेवरच मानाची हंडी फोडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी समन्वय समितीने प्रशासनाकडे केली. तसेच सर्व गोविंदांना लशीचे २ डोस पूर्ण करणार आणि सुरक्षित दहीहंडी उत्सवाची जबाबदारी आमची असेल असं या बैठकीमध्ये समन्वय समितीने स्पष्ट केलं होतं. मात्र सरकारने दहीहंडीसाठी परवानगी नाकारली आहे.