राजू शेट्टींच्या नेतृत्वात पूरग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘आक्रोश’ मोर्चा!
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
“कृष्णा, पंचगंगा नदीतील महापुराचे पाणी बोगद्यातून दुष्काळी भागाकडे वळवण्याच्या घोषणा निव्वळ धूळफेक आहे. अशा मोठ्या भांडवली खर्चच्या योजना आखून त्यातून पैसे हाणायचा उद्योग होणार आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची ही योजना कधीच पूर्ण होणार नाही.”, अशी टीका माजी खासदार व स्वाभीमानी शेतकरीचे संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा आज कोल्हापुरातील दसरा चौकातून काढण्यात आला. हजारो शेतकरी न्याय मिळाला पाहिजे, अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचले. यावेळी राजू शेट्टी यांनी शासनाच्या भूमिकेवर जोरदार टीका केली.
शेतकऱ्यांना मदत करणार अशी घोषणा करून, आघाडी सरकार पूरग्रस्तांची फसवणूक करीत आहे, असा आरोप करून शेट्टी म्हणाले की, “पूरग्रस्तांना पॅकेज देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. पण अजूनही कसलीही मदत मिळाली नाही. मदत मिळण्यासाठी मी ठाकरे यांच्याकडे गेलो पण भेट दिली नाही. अजूनही मदत दिली जात नाही. सानुग्रह अनुदान ही उपलब्ध केलेले नाही. मागील २०१९ सालच्या महापुराप्रमाणे मदत केली पाहिजे. पुराने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शाळा, कॉलेज सुरू झाले असल्याने फी कशी भरायची? याची चिंता सतावत असल्याने ती माफ झाली पाहिजे.”
पूरग्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलन करू नये. राज्यशासन मदतीसाठी तत्पर आहे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले होते. दोन्ही मंत्र्यांवर राजू शेट्टी यांनी टीका केली. ते म्हणाले, “महिना झाला तरी पूरग्रस्त शेतकऱ्यांना दमडीही मिळाले नाही. अशावेळी केवळ नुसते शांत बसायचे की भजन करत राहायचे हे मुश्रीफ यांनी सांगावे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी नेमकी काय मदत केली याचे स्पष्टीकरण करावे. पोकळ घोषणा करू नयेत.”