संभाव्य तिसऱ्या लाटेतही व्यवसाय सुरू राहतील याचे नियोजन करा
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेतही राज्यातील सर्व उद्योग सुरळीत सुरू राहतील यासाठी जिल्ह्य़ातील मोठय़ा उद्योगपतींची बैठक घेऊन नियोजन करा. ज्या उद्योगांच्या आवारात कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे तिथे वेळीच नियोजन करावे व ज्या उद्योजकांना ते शक्य नाही त्यांनी कंपनीच्या आसपासच्या परिसरात कामगारांची राहण्याची व्यवस्था करावी. त्यासाठी उद्योगांना आवश्यक ते सहकार्य करण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज्यभरातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांशी दूरचित्र संवादाच्या माध्यमातून चर्चा करून करोनास्थितीचा आढावा घेतला.
करोनाच्या दोन लाटेमधील हा काळ हा संयम आणि शिस्तीसाठी महत्त्वाचा आहे. या काळात करोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने काही प्रमाणात आर्थिक व्यवहार सुरू करत असलो तरी अतिशय सावधगिरीने पुढे जाण्याची गरज आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, उद्योग आणि आर्थिक चळवळ सुरू राहण्यासाठी कामगारांचे येणे-जाणे हे त्यांच्या कामाचे ठिकाण आणि घर इथपर्यंतच मर्यादित राहणे गरजेचे आहे. करोनाची दुसरी लाट अजूनही पूर्णत्वाने ओसरलेली नाही. परंतु याही स्थितीत काही प्रमाणात धोका पत्करून उद्योग-व्यवहार सुरू करताना सावधगिरीची पावले म्हणून जे निर्बंध लावण्यात आलेले आहेत, ते कागदावर राहणार नाहीत तर त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल. कुठेही गर्दी होणार नाही, सभा समारंभ होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
मुख्यमंत्र्यांनी जिल्हानिहाय प्राणवायूच्या तयारीचाही आढावा घेतला. त्यांनी प्राणवायूनिर्मिती, त्याचा साठा आणि रुग्णसंख्या वाढल्यास करावयाची पूर्वतयारी या सर्वच प्रक्रियेला वेग देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. तसेच आशा- अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत गावागावांत जनजागृती करून करोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतलेले सर्व जण दुसरा डोस वेळेत घेतील यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे. तसेच अहमदनगर जिल्ह्य़ातील पारनेर तालुक्यात जनुकीय उत्प्रवर्तन (जिनोम सिक्वेन्सी) करून घेण्याचे निर्देश ही आरोग्य विभागाला दिले.